लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी(दि. २७) दुपारी जेवणाच्या सुटीत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन पदाधिकारी, प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या पुणे येथील झालेल्या बैठकीत देशव्यापी मागणी दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषदेबरोबरच तालुकापातळीवरील पंचायत समित्यांच्या प्रवेशद्वारावरदेखील निदर्शने करण्यात आली. कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्तपदांवर नियमित भरती करा, प्रत्येक पाच वर्षांच्या कालावधीनंतर राज्यांतर्गत वेतन सुधारणा करण्यात यावी, महागाई रोखण्यासाठी जलद उपाययोजना करा, अंशकालीन व कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा तत्काळ नियमित करा, सार्वजनिक धर्म निरपेक्षतेचे रक्षण करा, मागासवर्गीय कर्मचा-यांचे सध्या रोखलेले पदोन्नती सत्र तत्काळ सुरू करा, राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सर्व संवर्ग कर्मचा-यांचे सेवा विषयक प्रश्न तत्काळ मार्गी लावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष अरुण आहेर, महेंद्र पवार, कैलास वाघचौरे, भगवान पाटील, डॉ. प्रदीप जायभावे, मंगला भवार, यासिन सय्यद, शोभा खैरनार, किशोर वारे, ज्योती गांगुर्डे, सोनाली साठे, रंजना शिंदे, नामदेव भोये यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषी, पशुचिकित्सा, आरोग्य, लेखा, परिचर आदी खात्यांचे कर्मचारी सहभागी झाले होते.(फोटो २७ मागणी)-जिल्हा परिषदेत मागणी दिनानिमित्त निदर्शने करताना कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी.