लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ग्राहकांकडून सेटटॉप बॉक्स व केबल कनेक्शनच्या व्यवहारापोटी जमा केलेल्या सुमारे १ कोटी ४३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तीन केबल चालकांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ डेननेट कंपनीचे सिद्धार्थ आत्माराम कापसे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्या फिर्यादीनुसार संशयित केबलचालक मिलिंद दयाराम कापसे (रा.दर्शन अपा.इंदिरानगर), जयलक्ष्मी गिरीश मूर्ती (सिमेन्स कॉलनी, सिडको) व स्मिता कस्तुरे (रा.पेठ फाटा) यांना डेननेटच्या द्वारका कार्यालयातून ६२ लाख ६३ हजार ६०३ रुपए किमतीचे सेट अप बॉक्स आपल्या ग्राहकांना वाटप करण्यासाठी दिले व त्यांनी वाटपही केले़ संशयित केबलचालकांनी १४ मार्च २०१५ ते २९ मार्च २०१७ दरम्यान सेट अप बॉक्स आणि ग्राहकांकडून वसूल केलेले एक कोटी ४३ लाख रुपये कंपनीस भरणे अपेक्षित होते मात्र ते अद्याप भरलेले नाही. दरम्यानच्या काळात सेवा बंद होईल या भीतीने कापसे यांनी बेकायदा कंपनीकडून डिजीटल सिग्नल प्राप्त करून तिन्ही केबलचालकांना पुरविले तसेच स्व:तच्याही नेटवर्कवर प्रसारित केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी केबल चालकांविरुद्ध फसवणूक व प्रकाशन हक्क (कॉपी राइट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डेन कंपनीस दीड कोटींचा गंडा
By admin | Published: June 03, 2017 1:07 AM