नाशिक : शहराच्या विविध भागांत वाढलेल्या डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासन आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच डेंग्यू फोफावल्याचा आरोप करण्यात आला. पूर्व प्रभाग समितीच्या सभापती नीलिमा आमले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी प्रभाग समितीची बैठक संपन्न झाली. नेहमीप्रमाणे गणसंख्येअभावी एक तास विलंबाने सभा सुरू झाली. प्रभाग ४० मध्ये डेंग्यूसदृश आजाराने बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही आरोग्य विभाग सुस्त असल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या एक वर्षांपासून जॉगिंग ट्रॅकची देखभाल होत नसल्याने दयनीय अवस्था झाल्याची तक्रार यशवंत निकुळे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केली. सर्वच प्रभागांमध्ये डेंग्यूचा फैलाव होत असून, त्यामुळे पालिकेने जनजागृती करावी, डास प्रतिबंधक धूर फवारणी करावी, तसेच प्रबोधनाचे पत्रक वाटण्याची मागणी नगरसेवकांनी केली. उद्यानांच्या दूरवस्थेवरही यावेळी चर्चा करण्यात आली. चर्चेत प्रा. कुणाल वाघ, वत्सला खैरे, रंजना पवार, वत्सला खैरे, अर्चना थोरात यांनी सहभाग घेतला. सभापती आमले यांनी डास प्रतिबंधक धूराळणी, औषध फवारणी व रस्त्याच्या डागडुजी करण्याचे आदेश दिले. यावेळी सुमारे पंधरा लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)
डेंग्यूवरून प्रशासन धारेवर
By admin | Published: September 21, 2016 11:06 PM