सिडकोत अस्वच्छता : नागरिकांमध्ये संतापसिडको : येथील दौलतनगर भागात डेंग्यूसदृश आजाराचा एक अल्पवयीन रुग्ण आढळून आला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सिडकोत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना आजाराचा सामना करावा लागत आहे. यातच अनियमित घंटागाडी, अस्वच्छता यामुळेही नागरिक त्रस्त झाले असून उघडे नाले व गटारींची अद्यापही स्वच्छता न झाल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. सिडको भागात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला असून याबाबत संबंधित विभागाचे अधिकारीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. सिडको भागात घंटागाडीची अनियमितता मोठ्या प्रमाणात जाणवत असून घंटागाडी येत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव घरातील कचरा मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यालगत फेकावा लागत आहे. यामुळे सिडकोत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. एकूणच आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे सिडकोतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोहित मोरे यास गेल्या आठ दिवसांपूर्वी ताप आला होता, तीन चार दिवस उलटूनही ताप जात नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची तपासणी केली असता त्याला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे सांगितले. सिडकोतील नाले, उघड्या गटारी पावसाळा सुरू होऊनही अद्याप साफ झाल्या नसल्याने नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळल्यानंतर नगरसेवक शीतल भामरे यांनी मनपाच्या आरोग्य विभागास कळवून या भागात विशेष स्वच्छता मोहीम राबविली. (वार्ताहर)
सिडकोत आढळला डेंग्यूसदृश रुग्ण
By admin | Published: June 22, 2016 11:35 PM