लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ज्याठिकाणी आरोग्याविषयी सर्वाधिक उपाययोजना आवश्यक मानली जाते, त्या जिल्हा शासकीय रुग्णालय आवार परिसरातच भंगाराच्या साहित्यात डेंग्यूची साथ पसरविणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्याने महापालिकेने नोटीस बजावली आहे. याशिवाय, नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, पंचवटीतील एसटी आगारासह एनडी पटेलरोडवरील एसटीच्या कार्यशाळेलाही मनपाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, महापालिकेने जून महिन्यात केलेल्या तपासणीत शहरात ३३५ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे कागदोपत्री दिसून येत असले तरी शहरात मात्र डेंग्यू डासांच्या अळ्या सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेमार्फत डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना राबविली जात आहे. महापालिकेची पेस्टकंट्रोल यंत्रणा, शासनासह वैद्यकीय विभागाची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. जून महिन्यात महापालिकेच्या पेस्टकंट्रोलमार्फत ७९ हजार ४५२ घरांची तपासणी करण्यात आली असता ३३५ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. दीड महिन्यात २६ रुग्णशहरात १ जानेवारी ते १६ जुलै या कालावधीत १४१ रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली होती. यंदा आतापर्यंत ४० रुग्णांना लागण झाल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय विभागाने दिली. गेल्या दीड महिन्यात ८२ संशयित रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली असता २६ रुग्णांना लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. सातपूरमध्ये ११३, नाशिकरोडमधील ८६, सिडकोतील ५६, पूर्वमधील ४५, पश्चिममधील २१, तर पंचवटीतील १४ घरांचा समावेश आहे. सातपूर व नाशिकरोडमध्ये अळ्या सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याशिवाय, ६३ हजार ९६१ पाण्याचे साठे तपासण्यात आले असता ३७५ पाणीसाठ्यात अळ्या निदर्शनास आल्या. महापालिकेच्या तपासणी मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालय आवारातील भंगार साहित्यातही डेंग्यूच्या एडीस जातीच्या डासांच्या अळ्या आढळून आल्याने मनपाने नोटीस बजावली असल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय विभागाने दिली. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेत शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये व्यापक तपासणी करण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात डेंग्यूच्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:35 AM