नाशिक : राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या आठ-दहा दिवसांत दिवाळीच्या सुटीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशेषत: सिडको परिसरात डेंग्यूच्या आजाराची सर्वाधिक लागण झालेली आहे. दरम्यान, शहरातील तपमानात घट होत नाही तोपर्यंत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखणे महापालिकेपुढे आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे. शहरात गेल्या आठ-दहा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णसंख्येत भर पडताना दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यात आतापर्यंत दीडशेहून अधिक रुग्ण डेंग्यू दूषित आढळले असून, जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीपर्यंत ही संख्या ४०० च्या पुढे गेली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये १३५ डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आले होते, तर जानेवारी ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ७७५ रुग्ण डेंग्यू दूषित आढळून येऊन त्यातील चार रुग्णांचा बळी गेला होता. यंदा, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी, गेल्या काही दिवसांत त्यात भर पडत चालल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सिडको भागात त्याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने, दिवाळीच्या सुटीमुळे अनेक घरे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे घरांमध्ये साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे. त्यामुळेच डेंग्यूची रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये सिडको विभागात सर्वाधिक ८० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेमार्फत ६२ पथकांद्वारे दर आठवड्याला अळीनाशक फवारणी, पाणी साठे तपासणी व अॅबेटिंगची मोहीम राबविली जात असून, ६ मोठी व २८ लहान धूरफवारणी यंत्राद्वारे फवारणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दिवाळी सुटी संपल्यानंतर आता गावाकडे परतलेले बांधकाम मजूर पुन्हा शहरात येत असून, बांधकामांची कामे सुरू होत आहेत. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी साठविल्या जाणाºया पाण्याकडेही लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.थंडीमुळे होणार प्रमाण कमीआता पावसाळा संपला असला तरी काही ठिकाणी पाणी साचलेले आहे. याशिवाय, अजून वातावरणात काही प्रमाणात उष्णतामान आहे. त्यामुळे सदर वातावरण हे डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक आहे. वातावरणातील तपमानात घट होत गेल्यानंतर डासांची उत्पत्ती थांबण्यास मदत होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आणखी आठ ते दहा दिवसांनी तपमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस आरोग्य विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे.
नाशकात डेंग्यूचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:40 PM