नांदगाव : शहराच्या काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याने रुग्णसंख्येत भर पडून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापासून शून्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर सुटकेचा श्वास घेत असताना डेंग्यूच्या केसेसमध्ये होणाऱ्या वाढीने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
गुरुकृपा नगर, स्वामी विवेकानंद नगर, हमालवाडा यासह नजीकच्या साकोरे गावात डेंग्यू रुग्ण आढळल्याची पुष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे, डॉ. गणेश चव्हाण, यांनी केली आहे. नगर परिषदेच्या पाण्याचे आवर्तन ५ ते ७ दिवसांत येत असल्याने नागरिकांनी पिण्याचे व वापराचे पाणी अधिक काळजीपूर्वक वापरण्यासाठी सुरुवात केली आहे. पावसाळ्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव होत असतो याचा अनुभव आहे.------------------------------नगर परिषदेने डेंग्यू निवारणासाठी आरोग्य विभाग, साफसफाई कर्मचारी यांची पथके तयार करून सर्वेक्षण सुरू केले आहे. खाचखळगी, कुंड्या, डबके व उघड्यावर साठवलेले स्वच्छ पाणी यात डेंग्यूच्या डासांची निर्मिती होते. त्यासाठी जनजागृती अभियान सुरू करत आहे.- विवेक धांडे, मुख्याधिकारी, नांदगाव