नाशिक - शहरात गेल्या पंधरा दिवसात डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले ८२ रुग्ण आढळून आले असून त्याची तिव्रता ओसरत चालल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दरम्यान, महापालिकेने डेंग्यूच्या डासांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन बांधकामांकडे लक्ष केंद्रीत केले असून गेल्या सहा महिन्यात १२८९ नागरिकांना नोटीसा बजावत समज देण्यात आली आहे.शहरात स्वाइन फ्ल्यूबरोबरच डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. राज्यात मुंबई-पुणेनंतर नाशिक हे हिटलिस्टवर होते. आॅक्टोबर महिन्यात ४७८ संशयित रुग्णांचे नमुने तपासले असता २४८ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते तर नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांची तपासणी होऊन २७६ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निदान झाले होते. मात्र, आता डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. दि. १ ते ७ डिसेंबर या कालावधीत १८७ रुग्णांचे रक्तनमुने तपासले असता ४९ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले तर दि. ८ ते १४ डिसेंबर या कालावधीत ९० रुग्णांची तपासणी होऊन ३३ रुग्ण डेंग्यूची बाधा झाल्याचे आढळून आले. पंधरा दिवसात ८२ रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने आता पुन्हा डेंग्यूचा फैलाव होऊ नये याकरीता नवीन बांधकामांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय, पंक्चर काढणा-या गॅरेजवाल्यांकडेही लक्ष पुरविले जात आहे. महापालिकेने दि. १ जून ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत १२८९ नागरिकांना नोटीसा देऊन समज दिलेली आहे. त्यात टायर-भंगार व्यावसायिक-४६५, नवीन बांधकामे-१५४, शाळा-३१, बेसमेंट-५९, सेप्टीक टॅँक बंदिस्त करण्यासाठी १७७ तर पाणी साठ्यांवर झाकण बसविण्यासाठी १०७ जणांचा समावेश आहे.नागरिकांना आवाहनडेंग्यूची तिव्रता ओसरत चालली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी घरात पाण्याचा अधिक काळ साठा करु नये. तसेच फ्रीजमागील पाणी वेळच्यावेळी बदलावे. पाणी साठविण्याच्या टाक्या बंदिस्त कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
नाशिक शहरात पंधरा दिवसात आढळून आले डेंग्यूचे ८२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 6:45 PM
नियंत्रणाचा दावा : १२८९ नागरिकांना नोटीसा
ठळक मुद्देडेंग्यूच्या डासांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन बांधकामांकडे लक्ष केंद्रीत नोव्हेंबर महिन्यात ६४४ संशयितांची तपासणी होऊन २७६ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निदान झाले होते