पंचवटी : रस्त्यावरील अनेक पथदीप बंद आहेत. प्रभागात ठिकठिकाणी मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. घंटागाडी नियमित येत असली तरी कचरा पडून राहतो तसेच खुद्द प्रभाग समिती सभापतींच्याच प्रभागात एक दोन नव्हे तर तब्बल तीसहून अधिक डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याचा धक्कादायक खुलासा सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने प्रभाग समितीच्या बैठकीत केल्याने संतप्त लोकप्रतिनिधींनी आरोग्य, तसेच विद्युत विभागाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. पंचवटी प्रभागाची मासिक बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीत तीन विषयांच्या साडेबारा लाख रुपयांच्या कामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ४ मधील फुलेनगर हा परिसर स्लम असल्याने त्या भागात पथदीप नियमितपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. विद्युत विभागाकडे तक्रार केली तर नावापुरतेच दोन पथदीप सुरू करतात. त्यानंतर तक्रारी सोडविल्या जात नाहीत. चौक तसेच गल्लीबोळातील पथदीप बंद असल्याने कोणी वयोवृद्ध तसेच लहान बालके रस्त्याने चालताना पडून जखमी झाले तर प्रशासन जबाबदारी घेणार का, असा सवाल नगरसेवक शांता हिरे यांनी उपस्थित केला. प्रभाग क्रमांक ३ मध्ये मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून ९० टक्क्यांपेक्षा जास्त पथदीप बंद असल्याची तक्रार पूनम मोगरे यांनी केली. प्रभाग क्रमांक ६ मध्ये अनेक पथदीप बंद असल्याने विद्युत विभागाचे कर्मचारी वाढवून तत्काळ तक्रारींचे निवारण करावे, अशी मागणी भिकूबाई बागुल यांनी केली. प्रभाग क्रमांक २ मध्ये श्वानांचा उपद्रव वाढलेला आहेच; शिवाय एकही स्वच्छता कर्मचारी प्रभागात येत नसल्याची तक्रार पूनम सोनवणे यांनी केली आहे. पालापाचोळा उचलण्यासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध नसल्याची तक्रार अरुण पवार यांनी केली. प्रभाग क्रमांक २ मधील काही परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे सुरेश खेताडे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत शीतल माळोदे, नंदिनी बोडके, पूनम धनगर यांच्यासह नगररचना विभागाचे दौलत घुगे, सी. बी. अहेर, आर. एम. शिंदे, आरोग्यचे संजय गोसावी, वसंत ढुमसे, राहुल खांदवे आदींनी सहभाग नोंदविला. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांचे तत्काळ निवारण करावे, अशा सूचना सभापती माने यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिल्या.
सभापतींच्याच प्रभागात डेंग्यूचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:23 AM
रस्त्यावरील अनेक पथदीप बंद आहेत. प्रभागात ठिकठिकाणी मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. घंटागाडी नियमित येत असली तरी कचरा पडून राहतो तसेच खुद्द प्रभाग समिती सभापतींच्याच प्रभागात एक दोन नव्हे तर तब्बल तीसहून अधिक डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याचा धक्कादायक खुलासा सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने प्रभाग समितीच्या बैठकीत केल्याने संतप्त लोकप्रतिनिधींनी आरोग्य, तसेच विद्युत विभागाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. पंचवटी प्रभागाची मासिक बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
ठळक मुद्दे प्रभागात एक दोन नव्हे तर तब्बल तीसहून अधिक डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण विद्युत विभागाचा खरपूस समाचार लहान बालके रस्त्याने चालताना पडून जखमी