नाशिक : राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहेच, परंतु आता तर हा पार्क खचण्यास प्रारंभ झाला असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास पार्कच गोदापात्रात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना राज ठकारे यांच्याकडे सूत्रे होती. त्यावेळी हा प्रकल्प साकारण्यात आला होता. मात्र नंतर त्याला अवकळा येत गेली. अशावेळी राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका त्यांची समर्थकांनी वेळोवेळी केली. परंतु २०१२ मध्ये मनसेची सत्ता पालिकेत येऊनही या प्रकल्पात पाच वर्षांत कोणतीही सुधारणा होऊ शकली नाही. केटीएचएम कॉलेजचे बोटक्लबपासून सुमारे चार ते साडेचार किलोमीटर लांबीचा गोदापार्क साकारण्यात आल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी नदीपात्रालगत गॅबियन वॉल बांधण्यात आली आहे. तथापि, दर पावसाळ्यात हा पार्क पुराच्या पाण्याखाली जातो. त्यानंतर त्याची काही प्रमाणात डागडुजी केली जाते. गेल्या काही वर्षात तर गोदापार्कची अधिक दुरवस्था झाली असून, आता तर गोदापार्कच खचायला लागला असून, रस्ते दुभंगू लागल्याने धोका निर्माण झाला आहे. या पार्कच्या खालून जाणारे गटारीचे पाणीदेखील धोकादायक आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी मुरते. त्यामुळे हळूहळू हा भाग खचू लागला आहे. भविष्यात पूर्ण पार्कच ढासळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूररेषेचा विचार करून महापालिकेने गोदापार्क ढासळू नये यासाठी गॅबियन वॉल बांधली आहे.दगडावर दगडे ठेवून जाळीने ही वॉल तयार करण्यात आली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षे ही गॅबियन वॉलच वाहून जाते असा अनुभव असल्याने आताही गोदापार्क ढासळत असताना ही भिंत त्याला कितपत रोखू शकेल याविषयी शंका आहे.
दुभंगला गोदापार्क, खचण्याची भीती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:11 AM