देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकलेल्या कांद्याचे पैसे चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांना रोखीने न देणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय संचालक मंडळ व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, अमावस्येच्या दिवशी लिलाव बंद ठेवण्याची अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा यापुढे बंद करून नियमितपणे लिलाव सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला.बाजार समितीच्या सभागृहात सभापती केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ व कांदा व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी लिलाव दोन सत्रात करण्यात यावे, शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली असून पूर्वी १९ असलेली कांदा व्यापाऱ्यांची संख्या आता २५ झाली आहे. देवळा शहरातील बाजारपेठ ही कांदा मार्केटवर पुर्णपणे अवलंबून आहे. साक्री, पिंपळनेरपासुन कसमादेतील शेतकरी कांदा विक्रीसाठी देवळा येथे आणत असल्यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, उमराणा, कळवण, वणी, चांदवड, सटाणा, नामपुर येथे नवीन कांदा मार्केट सुरु झाल्याने त्याचा फटका देवळा शहरातील व्यावसायिकांना बसला. शेतकरी कांदा विक्रीसाठी इतरत्र जाउ लागल्याने देवळा बाजार समितीमधिल कांद्याची आवक कमी होउ लागली होती. त्या पाश्व'भूमीवर बाजार समितीने काही परंपरांना छेद देत नवे बदल केल्याने आता कांदा आवकेत वाढ होताना दिसून येत आहे. स्वत: सभापती कांदा लिलावाप्रसंगी उपस्थित राहत आहेत. दरम्यान, बाजार समिती आवारात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.कोट....शासनाने निर्धारीत केलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. व्यापारी संख्या वाढविण्यासाठी मागेल त्याला परवाना देण्याचा निर्णय घेतला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोख पेमेंटबाबत व इतर तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा._ केदा आहेर, सभापती, बाजार समिती देवळा
देवळा बाजार समिती अमावस्येलाही अनलॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 3:33 PM