दरवर्षी हवामानातील बदल हाच विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरला आहे. मात्र कोरोनाने संपूर्ण जग विळख्यात घेतल्यानंतर प्रारंभी कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या सारी रुग्णांकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, मात्र सारी रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणे व कोरोना रुग्णांची लक्षणे जवळपास सारखीच असल्याचे लक्षात आल्यावर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. सारी रुग्णांना दम लागणे, ताप येणे, सर्दी, खोकला याचबरोबर शारीरिक कमकुवतपणा येण्याचे प्रकार वाढीस लागल्याने आरोग्य विभागाने सारीच्या रुग्णांचीही कोरोना चाचणी केली असता, अशा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचे निदर्शनास आले; परंतु सारीच्या रुग्णांवरही कोरोनाचीच उपचार पद्धती अवलंबिण्यात आली. त्यातून अनेक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या आरोग्य तपासणीत सारीचे रुग्ण आढळू लागली आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका सारीचा हॉटस्पॉट बनला असून, १२१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. अन्य ठिकाणी अपवादात्मक रुग्ण आढळत आहेत. वेळीच निदान व उपचारामुळे सारीला आटोक्यात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
----------
फीव्हर क्लिनिकमध्ये उपचाराची सोय
कोरोना रुग्णांप्रमाणेच सारीच्या रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य विभागाने गावोगावी फीव्हर क्लिनिकदेखील सुरू केले आहेत. रुग्णाच्या आजाराचे निदान झाल्यानंतर अशा रुग्णांवर फीव्हर क्लिनिकमध्ये उपचार करण्यात येत आहेत, तर काही रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत.
-------
हवामान बदल व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सारीच्या रुग्णांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली; परंतु आजाराचे योग्य निदान झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार झाल्याने सारी रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आले आहे.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
------