देवळाली कॅम्प : पारशी धर्मीयांचा ‘पतेती’ हा नववर्षाचा उत्सव देवळालीतील ‘द झोरोष्ट्रीयन फायर टेम्पल’ अर्थात अग्यारी (अग्निमंदिर) येथे समाजबांधवांची गळा भेट घेत नववर्षांच्या शुभेच्छा देत शुक्रवारी साजरा करण्यात आला. देवळाली परिसरात पारसी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांचा मुख्य असलेल्या पतेती सणानिमित्त वर्षातील शेवटचे नऊ दिवस हे पितरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात आणि दहाव्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात केली जाते. अग्यारीत दस्तुरजी नोजर मेहंती यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे अग्निपूजा, पूर्वजांचे स्मरण करून करण्यात येणारी ‘जश्न पूजा’ करण्यात आली. पारशी धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या ‘अवेस्ता’ या धार्मिक ग्रंथाचे पठण करण्यात आले. या सणानिमित्त विविध ठिकाणांहून पारशी बांधव देवळालीत दर्शनासाठी दाखल झाले होते. वर्षाच्या शेवटच्या दहा दिवसांपैकी अंतिम पाच दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. पतेती सणाच्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर व मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दहा दिवसांत आपल्या पूर्वजांच्या समर्थनार्थ (मुक्ताड)विधी अग्यारीमध्ये केला जातो. दिवसातून पाच वेळेस पवित्र अग्निची विधीवत पूजा करण्यात आली. शुक्रवारी पारशी बांधवांनी धर्मगुरुंना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
देवळालीत पतेती सण उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:19 AM