लासलगाव : कोरोना या साथरोगाच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाच्या लॉकडाउनमुळे गेली काही दिवस रखडलेली परराज्यात जाणारी द्राक्षे आता दोन दिवसांपासून उगाव व शिवडी भागातून विविध राज्यांत दररोज चाळीस ते पन्नास मालट्रकने रवाना होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या जिवात जीव आला असला तरी स्वत: जबाबदारी स्वीकारून कमिशन तत्त्वावर माल विक्री होत असल्याने महागडा वाहतूक व इतर खर्च वजा जाता इतर वेळी साठ ते ऐंशी रुपयांची विक्री होणारी निर्यातक्षम द्राक्षे केवळ सात ते दहा रुपयेकिलोने विक्र ी करावी लागत आहे.लॉकडाउनमुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील द्राक्ष हंगाम अडचणीत सापडला आहे. उत्पादित द्राक्षमालाचे करायचे काय हा यक्षप्रश्न द्राक्ष उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे. आता एप्रिल महिन्यात पंधरा तारीख आल्याने द्राक्ष वेलीवर चांगले पोषण व साखर तयार होऊन उत्कृष्ट दर्जाचा माल तयार झाला आहे, अशी माहिती शिवडी येथील द्राक्ष उत्पादक रामनाथ शिंदे यांनी सांगितले.कोरोनामुळे सोशल डिस्टन्सचा वापर करीत सॅनिटायझर्सचा वापर करून ही द्राक्षे पाठविली जात आहेत. कमिशन तत्त्वावर ही द्राक्षे पाठविली जात असून, ही सोय सुरू झाली आहे. त्यामुळे दोन पैसे की होईना बागायतदारांना मिळणार आहे असे सांगितले.
परराज्यात द्राक्षे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 8:33 PM