नाशिक : मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रथम वेतनाचे नियोजन करावे, अशा एस.टी. महामंडळाच्या स्पष्ट सूचना असतानाही स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून नियोजन केले जात नसल्याचे आढळल्याने एस.टी. कामगार संघटनेला आंदोलन करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे शिवसेनेकडे परिवहन खाते असतानाही स्थानिक प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन ७ ऑगस्ट रोजी होणे अपेक्षित असताना अजूनही कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकलेले नाही. यासाठी स्थानिक विभागीय मंडळाकडून नियोजन होणे अपेक्षित असतानाही केवळ चुकीच्या नियोजनामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असल्याचा आरेाप करीत एस.टी. कामगार सेनेने सोमवारी सकाळी एन. डी. पटेल रोडवरील विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
याप्रकरणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविडमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने २३ नोव्हेंबर २०२० मध्येच सर्व विभागीय मंडळाला आपापल्या स्तरावर प्रथम वेतनाचे नियोजन करावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार एकूण वेतनाच्या प्रमाणात मिळणाऱ्या दैनंदिन उत्पन्नातून वेतनासाठी निधी राखून ठेवणे आवश्यक आहे. मात्र तसे कोणतेही नियोजन केले गेले नसल्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत आहे.
याबाबतचा जाब विचारण्यासाठी सेनेच्या वतीने सकाळी आंदोलन करण्यात आले. सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित ठेवले जात असल्याचा देखील आरोप करण्यात आला असून एस.टी. बँक खात्यातून कर्मचाऱ्यांना पैसे काढता येऊ नये, यासाठी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याबाबतचे नियोजन विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांना देण्यात आले.
याप्रसंगी राज्य संघटक सुभाष जाधव, महिला आघाडी राज्य संघटक सचिव शारदा ढिकले, विभागीय अध्यक्ष श्याम इंगळे, विभागीय संघटक सचिव भास्कर उगले, राहुल खैरनार, राजाभाऊ ब्राह्मणकर, विशाल वाजे, राजाभाऊ पाठक, प्रवीण हाडवळे, उमेश कुटे, अनुप खैरनार आदी उपस्थित होते.
--कोट--
शासनाच्या नव्हे तर प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळेच कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत आहे. अशाप्रकारे कर्मचारी वेठीस धरले जात असतील तर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशाचे पालन केले तर कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होऊ शकेल.
- देविदास सांगळे, विभागीय सचिव, एस.टी. कामगार सेना.
--इन्फो--
राज्य सचिवांचा व्हिडीओ संवाद
ठिय्या आंदोलन सुरू असताना एस.टी. कामगार राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी आंदोलनकर्त्यांशी व्हिडीओ संवाद साधला. वेतनाची फाईल तांत्रिक अडचणीमुळे थांबली असून, यावर लवकरच तोडगा काढण्यासाठी एस.टी. कामगार सेना प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
230821\23nsk_32_23082021_13.jpg
विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांना निवेदन देतांना सुभाष जाधव, देविदास सांगळे, श्याम इंगळे, भास्कर उगले, राहूल खैरना, शरादा ढिकले