नांदगाव : कोरोनाकडे बघण्याचा ग्रामीण दृष्टिकोन अद्यापही बदलण्यास तयार नसल्यामुळे या दृष्टिकोनानेच एका भाऊ-बहिणीचा बळी घेतल्याची घटना नांदगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वीच घडली आहे. वेळेत उपचार न झाल्याने ही दुर्दैवी घटना समोर आली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या महिलेच्या परिवाराने तिला माहेरी भावाकडे पाठवून दिले. भावाने तिला डॉक्टरकडे नेऊन उपचार करण्याऐवजी घराशेजारी बांधलेल्या कांद्याच्या चाळीत इतरांच्या नजरेपासून दूर ठेवले. जेवण, चहा, अंथरूण, पांघरूण, कपडे सगळे व्यवस्थित पुरवले. विलगीकरणात ठेवले की कोरोना बरा होईल, या भाबड्या आशेत असलेल्या भावाच्या बहिणीची तब्येत अधिकच बिघडली आणि ती काही दिवसांतच इहलोक सोडून गेली.
बहिणीचा कोरोना इतरांपासून लपवून ठेवत त्याने तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. दरम्यान, कोरोनाने त्यालाही गाठले होते. अंगदुखी, ताप या कारणांमुळे त्याची तब्येत बिघडली. आपल्याला कोरोना होणार नाही. या बेफिकिरीत काही दिवस निघून गेले. अखेर हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत रक्तातली ऑक्सिजन पातळी ७० पेक्षाही खाली गेली होती. उपचारांना त्याने दाद दिली नाही. बहिणीच्या मागे भाऊ अनंताच्या प्रवासाला निघून गेला. उपचारांना उशीर झाल्याने अशाच प्रकारे अनेकांची आयुष्ये संपून गेली. कोरोनावर वेळेत उपचार केले तर तो बरा होतो, ही प्रतिमा समाज मनावर ठसणे गरजेचे झाले आहे. भावा-बहिणीचे जाणे त्या खेड्यातील लोकांना मात्र चटका लावून गेले.
इन्फो
वस्तुस्थिती दडवण्याचा प्रयत्न
कुटुंबातील व्यक्तीला कोरोना झाला आहे असे समजले की, कुटुंबच वाळीत टाकले जाते. कोरोना बरा झाला तरी याच्यापासून ‘धोका’ आहे या नजरेनेच बघितले जाते. त्यामुळे आहे ते लपविण्याची मानसिकता तयार झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेने प्रचंड दहशत निर्माण केली होती. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीला गावबंदी केली जायची व विलगीकरणास सामोरे जावे लागायचे. दुसऱ्या लाटेत मात्र गावात प्रवेश मिळत असला तरी कोरोनाला चिकटलेली सामाजिक कलंकाची भीती अद्याप गेलेली नाही. यामुळेच कुटुंबातली व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, वस्तुस्थिती समाजापासून दडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.