ऋषीमुनी महातपस्वी मनसापुरी महाराज यांच्या आशिर्वादाने तेरा वर्षापासून नांदूरशिंगोटे ते आळंदी पायी दिंडी सोहळा आयोजित केला जात आहे. येथील रेणुकामाता मंदिराच्या प्रांगणातून सजविलेल्या आकर्षक रथातून ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची व मनसापूरी महाराज यांच्या पादुकांची गावातून टाळमृदुंगाच्या गजरात व सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावात विविध ठिकाणी रथाचे पूजन करण्यात आले. सकाळी रेणुकामाता मंदिरासमोर सरपंच गोपाळ शेळके, उपसरपंच शरद शेळके यांच्या हस्ते रथास श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले. यावेळी दीपक बर्के, भारत दराडे, दत्ता सानप, नानापाटील शेळके, निवृत्ती शेळके, बी. के. आव्हाड, उत्तम बर्के, अनिल शेळके, रवींद्र शेळके, संजय शेळके, रमेश सानप, नागेश शेळके, गणेश बर्के, सोमनाथ नवले आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दिंडीसाठी ज्या अन्नदात्यांनी सहयोग दिला आहे. त्यांचा यावेळी मनसापुरी महाराज वारकरी विकास संस्थेच्यावतीने सन्मानपत्र व शाल-टोपी देवून सत्कार करण्यात आला. सकाळी १० वाजता टाळ -मृदूंगाच्या गजरात निमोण नाका परिसरातून दिंडीचे संगमनेरकडे प्रस्थान झाले . यावेळी दिंडीतील भाविकांच्या खांद्यावर भगव्या पताका व मुखातून हरिनामाचा गजर करत दिंडी मार्गस्थ झाली. तसेच महिला भाविकांच्या डोक्यावर तुलसी वृंदावन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पायी दिंडी सोहळा संगमनेर, चंदनापुरी, कर्जुलेपठार, घारगाव, बोटा, आळेफाटा, नारायणगाव, चौदा नंबर, कळम, पेठवस्ती, खेड, चाकण, मोशी मार्गे रविवार (दि.२) रोजी देवाची आळंदी येथे पोहचणार आहेत. आळंदी येथील सुयश मंगलकार्यालयात दिंडीचा मुक्काम राहणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्यात मुक्कामाचे ठिकाण, भोजन, नाष्टा आदींची व्यवस्था व दररोज रात्री प्रवचन व कीर्तने पार पडणार आहे. संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त बुधवार (दि.५) डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत ह. भ. प. सुनील महाराज झांबरे यांचे काल्याचे कीर्तन होईल. परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
नांदूरशिंगोटे ते आळंदी पायी दिंडीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 6:51 PM