नाशिक : हरिनामाचा जयघोष करत गुरुवारी (दि. २४) त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरपूरसाठी औपचारिक प्रस्थान झाले. दरवर्षी याच मुहूर्तावर पालखीचे पायी दिंडीने प्रस्थान होते. परंतु यंदाही शासनाने कोरोनाचा धोका लक्षात घेता पायी वारीला परवानगी नाकारल्याने परंपरा खंडित होऊ नये यासाठी मंदिरातच प्रस्थान सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
पायी दिंडीने पालखी सोहळ्याची परंपरा अबाधित राहावी यासाठी केवळ औपचारिकता म्हणून अभंग, पूजा, आरती होऊन पालखी मंदिराबाहेर आणून प्रदक्षिणा घालण्यात आली. या वेळी ‘बोला पुंडलिक वरदा हरी ऽऽ विठ्ठल श्री नामदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय, श्री निवृत्तीनाथ महाराज की जय...’असा हरिनामाचा जयजयकार करीत टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. धर्मदाय सहआयुक्त जयसिंगराव झपाटे यांच्या हस्ते सकाळी मंदिरात महापूजा व आरती झाली. त्यानंतर अभंग सादरीकरण होऊन पालखी मानकऱ्यांनी खांद्यावर घेतली. या वेळी दिंडी सोहळ्याचे मानकरी म्हणून ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज डावरे आदींसह प्रशासकीय समितीचे प्रशासक सहायक धर्मदाय आयुक्त के.एम. सोनवणे, सदस्य ॲड. भाऊसाहेब गंभीरे, पुजारी ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी, पुजारी तथा माजी विश्वस्त ह.भ.प. जयंत महाराज गोसावी, ह.भ.प. योगेश महाराज गोसावी, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव, त्र्यंबक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे आदी उपस्थित होते. या वेळी मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवळ विश्वस्त मंडळासह मोजक्याच वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दरम्यान, पालखी प्रस्थानसमयी माजी विश्वस्त ललिता शिंदे सोहळ्यात सामील होण्यासाठी आल्या असताना त्यांना पोलिसांनी रोखले. या वेळी वाद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला.
इन्फो
१९ जुलै रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ
दरवर्षी आषाढी एकादशीच्या पूर्वी २६ दिवस अगोदर त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान पायी दिंडीने पंढरपूरकडे होत असते. दोन दिवस नाशिक येथे मुक्काम करत पालखी नाशिक-पुणे महामार्गाने अहमदनगर येथे जात असते. याठिकाणी योगिनी एकादशीला संत निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत असतो. त्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन ती आषाढ शुद्ध दशमीला पोहोचत असते. मात्र कोरोनामुळे पायी वारी थांबली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही पालखीचे प्रस्थान १९ जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने होणार आहे. तोपर्यंत पालखी मंदिरातच मुक्कामी राहणार आहे. या काळात नियमित भजन, पूजाविधी पार पडणार आहेत.
फोटो - २४ पीएजेयु९०/९४/८८
आषाढी एकादशीला पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे औपचारिक प्रस्थान मोजक्या वारकऱ्यांसह मानकऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
===Photopath===
240621\24nsk_28_24062021_13.jpg~240621\24nsk_29_24062021_13.jpg~240621\24nsk_30_24062021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ पीएजेयु९०/९४/८८आषाढी एकादशीला पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे औपचारिक प्रस्थान मोजक्या वारकऱ्यांसह मानकऱ्यांच्या उपस्थितीत झाले.~फोटो - २४ पीएजेयु ९४~२४ पीएजेयु ८८