मालेगाव : जंगलातील मुळ आधिवास विसलेल्या व येथील वनविभागाच्या ताब्यात असलेल्या दोन्ही जखमी पाडसांच्या प्रकृतीची सुधारणा झाल्यानंतर त्यांची गुरूवारी औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. संग्रहालयाच्या संचालकांच्या ताब्यात वनपालांनी हरणांचे पाडस सुपूर्द केले आहे.तालुक्यातील चिखलओहोळ शिवारात गेल्या ४ मार्च रोजी विहिरीत पडलेले हरणाचे पाडस उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती. वनकर्मचाऱ्यांनी पाडस ज्या भागात मिळून आले त्या भागातील जवळच्या जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र हरणांच्या कळपाकडे पाडसाने धाव न घेता कर्मचाऱ्यांकडे आले होते. येथील नर्सरीत दूध व पाणी दिले जात होते. कर्मचाºयांचा लळा लागल्याने जंगलातील आधिवास विसरले होते. या पाठोपाठ ७ मार्च रोजी दहिवाळ शिवारातील जखमी दुसरे पाडस सापडले होते. त्यालाही जंगलातला अधिवास विसरून मानवी लळा लागला होता. या पार्श्वभूमीवर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे यांनी उपविभागीय वनअधिकारी जगदीश येडलावार यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. येडलावार यांनी त्यांच्या संगोपनासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर (वन्यजीव) यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी दोघा पाडसांना औरंगाबादच्या उद्यानात पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुरूवारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी हरणांच्या दोघा पाडसांची वैद्यकीय तपासणीकेली.प्रकृती सुस्थितीत असल्याचा दाखला दिल्यानंतर तालुका वनअधिकारी कांबळे यांनी वनरक्षक योगेश पाटील, वनपाल अरुण भडांगे यांच्याकडे पाडस सुपूर्द केले. त्यांनी शासकीय वाहनातून औरंगाबाद येथे घेवून जावून सिद्धार्थ प्राणी संग्रहालयांचे संचालकांकडे पाडस दिले आहे. या दोघा पाडसांचे संगोपन वनोद्यानात होणार आहे.
‘त्या’ पाडसांची रवानगी प्राणी संग्रहालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 10:47 PM