नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या प्रभाग सभापतिपदाची समीकरणे येत्या ६ एप्रिलला प्रभाग १३ (क) मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर अवलंबून आहेत. पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखली अथवा शिवसेनेने खेचून घेतली तर पश्चिमवर विरोधकांचा सभापती विराजमान होईल आणि भाजपाने जागा जिंकली तर चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाचा फैसला केला जाईल. त्यामुळे पोट निवडणुकीतील निकालानंतरच पश्चिमच्या सभापतिपदाची निवडणूक चर्चा रंगणार आहे. पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक ७, १२ आणि १३ हे तीन प्रभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. पश्चिम विभागात भाजपा- ५, शिवसेना- १, कॉँग्रेस- ४, राष्टÑवादी- १ आणि मनसे- १ असे पक्षीय बलाबल होते. मात्र, मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांचे निधन झाल्याने रिक्त जागेसाठी दि. ६ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत प्रामुख्याने मनसेच्या अॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपाच्या विजया हरिष लोणारी यांच्यात मुख्य लढत आहे. सद्यस्थितीत पश्चिममध्ये भाजपाचे योगेश हिरे, हिमगौरी अहेर, स्वाती भामरे, प्रियंका घाटे व शिवाजी गांगुर्डे; शिवसेनेचे अजय बोरस्ते; कॉँग्रेसचे समीर कांबळे, वत्सला खैरे, शाहू खैरे व डॉ. हेमलता पाटील; राष्टÑवादीचे गजानन शेलार हे सदस्य आहेत. मागील वर्षी सभापतिपदासाठी कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील विरुद्ध भाजपाच्या प्रियंका घाटे अशी लढत झाली होती. त्यावेळी सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने ऐनवेळी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पश्चिम प्रभागच्या निवडणुकीतही मनसेची भूमिका निर्णायक ठरणार होती. परंतु, मनसेच्या सुरेखा भोसले या आजारपणामुळे निवडणुकीवेळी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील या ६ विरुद्ध ५ मतांनी निवडून आल्या होत्या. आता पोटनिवडणुकीत मनसेने जागा राखल्यास भाजपा विरोधकांचा सभापती होणार हे जवळपास निश्चित आहे. कारण, स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपाऐवजी सेना उमेदवाराला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे राज ठाकरे यांची आगामी वाटचाल पाहता मनसे भाजपाची साथ सोडण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपाने जागा जिंकल्यास पश्चिम विभागात संख्याबळ ६-६ असे समसमान होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाचा फैसला करावा लागणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निकालानंतरच पश्चिमच्या सभापतिपदाची चर्चा खºया अर्थाने रंगणार आहे. सभापतिपद कुणाच्या गळ्यात?पश्चिम विभागातील सदस्य असलेले अजय बोरस्ते यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. हिमगौरी अहेर या स्थायी समिती सभापती आहेत. समीर कांबळे यांना स्थायीवर संधी देण्यात आली आहे. शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीचे सभापतिपद उपभोगले आहे. गजानन शेलार राष्ट्रवादीचे गटनेता तर शाहू खैरे कॉँग्रेसचे गटनेता आहेत. त्यामुळे या सदस्यांपैकी एकही सभापतिपद स्वीकारणार नाही अथवा त्यांना दिले जाणार नाही. स्वाती भामरे या आमदार फरांदे यांच्या समर्थक आहेत तर योगेश हिरे हे आमदार सीमा हिरे यांचे दीर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून दुय्यम अशा सभापतिपदाला होकार मिळण्याची शक्यता कमीच आहे. वत्सला खैरे यांना स्थायीच्या पहिल्याच वर्षी सदस्यत्वाची संधी देण्यात आलेली होती त्यामुळे त्या स्पर्धेत नाहीत. भाजपाकडून पुन्हा एकदा प्रियंका घाटे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. मनसेने जागा राखलीच तर अॅड. वैशाली भोसले यांना राजकारणातील पदार्पणातच सभापतिपदाची लॉटरी लागू शकते.