नाशिक- शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या अवघी तीन असताना आठ बाधीत रूग्ण बाहेरील आहेत. जिल्हा आणि शहराच्या सीमा सिल असताना देखील बाहेरून नागरीक येत असल्याने शहर सुरक्षीत राहाण्यासाठी सीमा रेषेवर सीआरपीएफ किंवा तत्सम यंत्रणा नियुक्त करावी अशी मागणी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी (दि.२८) जिल्ह्याच्या आरोग्य स्थितीचा आढावा घेणारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यानिमित्ताने महापौर कुलकर्णी यांनी त्यांना पत्र दिले आहे. नाशिकध्ये सध्या कोरोना बाधीतांची संख्या अत्यंत मर्यादीत आहेत गेल्या काही दिवसात वाढलेले रूग्ण बघितले तर ते नाशिक बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे बाहेरील व्यकींकडून शहरात संसर्ग वाढू शकतो अशी भीती महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. नाशिक शहरालगत असलेल्या जिल्ह्यातून काही रूग्ण आणि व्यक्ती दाखल झाल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळल्यानंतर नाशिकमधील त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला देखील संसर्ग होऊ शकतो आरि नाशिकमध्ये अकारण स्थिती गंभीर होऊ शकते असे महापौर कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
नाशिक शहरात सध्या ११ कोरोना बाधीत उपचार घेत आहेत. मात्र तीनच रूग्ण नाशिक शहरातील आहेत बाकी मुंबई, मुंब्रा, मानखुर्द,मालेगाव आणि धुळे येथून आलेले आहेत. जिल्ह्याच्या आणि शहराच्या सीमा सील असतानाही बाहेरून नागरीक शहरात येत आहेत. यातील अनेक जण रात्रीच्या वेळी रूग्णवाहिका, मालवाहू ट्रक, खासगी वाहने आणि पायी शहरात दाखल होत आहेत. रात्रीच्या वेळी पोलीसांचा बंदोबस्त असतानाही अशाप्रकारे शहरात नागरीक येत आहेत ही अत्यंत घातक बाब आहे. त्यामुळेच नाशिक शहरातील नियंत्रणातील स्थिती तशीच राहावी असे वाटत असेल तर सीआरपीएफ किंवा तत्सम यंत्रणा शहर आणि जिल्ह्याच्या सीमेवर तैनात करावी अशी मागणी महापौर कुलकर्णी यांनी केली आहे.