नाशिक : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून गणेशवाडी येथे उभारलेले भाजीमार्केट सुरू करण्याविषयी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी लिलावाद्वारे देण्यात आलेल्या १६८ ओटेधारकांनी मासिक जागा लायसेन्स फी न भरल्याने आणि त्याठिकाणी व्यवसायही सुरू न केल्याने महापालिकेने संबंधित ओटेधा-रकांची अनामत रक्कम जप्त केली असून, पुन्हा नव्याने लिलावप्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली आहे.महापालिकेने सुमारे ६ कोटी रुपये खर्चून गाडगे महाराज पुलालगत गणेशवाडी भाजीमार्केट उभारलेले आहे. परंतु, भाजीमार्केटची उभारणी झाल्यापासून तेथे एकही विक्रेता व्यवसायासाठी तयार झालेला नाही. गंगेवरील भाजीबाजार सदर मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न महापालिकेने वारंवार केले परंतु, विक्रेत्यांनी त्याठिकाणी व्यवसाय होणार नाही, असे कारण दर्शवत मार्केटमध्ये जाण्यास नकार दिला. मार्केटमधील ओट्यांना प्रतिसाद न मिळाल्याने मार्केट ओस पडले. परिणामी त्याचा कब्जा भिकाºयांनी घेतला. दरम्यान, सदर मार्केटमध्ये सराफ बाजारातील फुलबाजारही स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाला परंतु, विक्रेत्यांनी तो हाणून पाडला. डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्त असताना त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सदर भाजीमार्केट सुरू होण्यासाठी लिलावाची प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार, एकूण ४६८ ओट्यांचा जाहीर लिलाव करण्यात आला होता. त्यात १६८ ओट्यांनाच बोली प्राप्त झाली होती. परंतु, त्यातील ४२ भाजीपाला व तत्सम व्यवसाय करणारे ओटेधारक यांनी अटी-शर्तीनुसार प्रथम तीन महिन्यांची आगाऊ मासिक जागा लायसेन्स फी न भरल्याने त्यांची अनामत रक्कम त्याचवेळी जप्त करण्यात आली होती. तर उर्वरित १२६ ओटेधारकांनीही मासिक जागा लायसेन्स फी न भरल्याने महापालिका प्रशासनाने त्यांचीही अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदर मार्केटची पाहणी केल्यानंतर त्यांनी मार्केट तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, लवकरच पुन्हा लिलावप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मार्केटची साफसफाईआयुक्तांनी मार्केट पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने सदर मार्केटची साफसफाई करत तेथे आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, रस्त्यावर कुठेही भाजीविक्रेत्यांना व्यवसाय करू न देण्याचा निर्धार आयुक्तांनी केल्याने भाजीविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्यातच सराफ बाजारातील फुलबाजारही पुन्हा एकदा स्थलांतरित करण्याचा विचार असल्याचीही माहिती सूत्रांनी बोलून दाखविली आहे.
भाजीमार्केट ओटेधारकांची अनामत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:40 AM