नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणाच्या वाढीव उंचीमध्ये गेली ८-१० वर्षांपासून जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा म्हणून येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली आहे.
इगतपुरी तालुक्यात आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या गेल्या असून, मुकणे धरणाच्या वाढीव उंचीमध्ये ८-१० वर्षांपासून येथील प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळण्यासाठीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पाण्याखाली गेलेल्या जमिनींचे पंचनामे करून १४ गावांचा रखडलेला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून वाढीव मोबदला मिळावा याबाबत सकारात्मक चर्चा होऊन याबाबत लक्ष देणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यावेळी डॉ. दिलीप खातळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे, ज्येष्ठ नेते रावसाहेब मालूंजकर, निवृत्ती कातोरे, शंकरराव गोवर्धने, कचरू गोवर्धने, नामदेव गोवर्धने, निवृत्ती गोवर्धने आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
--------------------
गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या असून, अजूनही नवनवीन प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करण्यात येत आहे. मुकणे धरणाच्या वाढीव उंचीमध्ये गेल्या आठ ते दहा वर्षांपासून वाढीव मोबदला मिळाला नसून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला तातडीने देण्यात यावा. यामुळे प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळेल.
- बाळासाहेब कुकडे, काँग्रेस उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा