केंद्र सरकारच्या चयन बोर्डामार्फत २०१८पूर्वी पॅरा मिलिटरी फोर्ससाठी परीक्षा घेण्यात आल्या. या पॅरा मिलिटरी म्हणजेच निमलष्कराअंतर्गत सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीएपीएफ अशा विविध शाखांअंतर्गत भरतीसाठी ही मोहीम २०१७ मध्ये राबविण्यास प्रारंभ झाला. एकूण १ लाख ९ हजार रिक्तपदे असल्याने घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षेत देशभरातील दीड लाख युवकांनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यात उत्तीर्ण झालेल्या ६२ हजार २१० युवकांची मेडिकल फिटनेस चाचणी घेण्यात आली. परंतु आता शासनाने जी भरती सुरू केली ती केवळ ५५ हजार पदांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित पात्र युवकांना संधी कधी मिळणार असा प्रश्न आहे. आगामी प्रक्रिया लांबली तरी पात्र उमेदवारांचीदेखील वयोमर्यादा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्यातील २१०० युवक या भरतीसाठी पात्र झाले आहेत. हे सारेच केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार करीत असून अन्य राज्यातील उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील युवकांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारनेदेखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
निमलष्करी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही भरतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:24 AM