लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाणीदार तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्याला यंदा पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी जिल्ह्णात जेमतेम पाऊस होत असताना कळवण तालुक्यात कधीच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही, आता मात्र कळवण तालुक्यातील काही विशिष्ट गावांना सातत्याने जाणवणारे भूकंपाचे धक्के तसेच भूगर्भातील हालचालीमुळे विहिरींनी तळ गाठल्याचा ग्रामस्थांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे भूजल तज्ज्ञ, भूगर्भ शास्त्रज्ञदेखील चक्रावून गेले आहेत. कळवण तालुक्यात चणकापूर, पूनद या मोठ्या धरणांबरोबरच ओतूर, देगू, नांदुरी यांसारखे अनेक लहान प्रकल्प कार्यान्वित असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली आली आहे, त्याचबरोबर कळवण तालुक्याला पाण्याची टंचाईदेखील कधी भासली नाही. जिल्ह्णात सातत्याने पर्जन्यमान घसरत असताना कळवण तालुक्यात जेमतेम पाऊस होऊनही पाण्याची मुबलकता कायम राहिली. यंदा मात्र डिसेंबर, जानेवारीपासून कळवण तालुक्यातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याच्या मागणीने जोर धरल्याने त्यामागची कारणमिमांसा करताना या भागात सातत्याने बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने जमिनीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याचा दावा ग्रामस्थ करू लागले आहेत. विशेष करून सप्तशृंग गडाच्या मागच्या बाजूला असलेल्या ओतूर, कुंडाणे, शिरसमणीच्या पश्चिम भागाबरोबरच चणकापूर धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या दह्णाणे आदि भागांतही खोल गेलेल्या पाण्याच्या पातळीवर चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. डिसेंबर महिन्यात ६० ते ७० फूट पाण्याने भरलेल्या विहिरी जानेवारी महिन्यात अचानक खोलवर गेल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. एरव्ही दरवर्षी पाऊस कितीही पडला तरी, मार्च महिन्यापर्यंत बऱ्यापैकी पाणी साठवून ठेवणाऱ्या विहिरी यंदा कोरड्या पडू लागल्याने भूगर्भाच्या पोटात नेमके काय दडले याची चिंताही ग्रामस्थांना भेडसावू लागली आहे. जमिनीखालून आवाज येणे, भूकंपाचे हलके धक्केजाणवणे, अचानक पाण्याची पातळी खोल जाणे या भूगर्भातील हालचाली संशोधनाचा विषय झाला असून, यापूर्वी भूजल तज्ज्ञ, भूगर्भ शास्त्रज्ञ, मेरी यांसारख्या संस्थांनी प्रत्यक्ष या गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे, परंतु त्यांनाही ठोस कारणे गवसू शकलेले नाहीत. सप्तशृंग गडाच्या मागच्या बाजूच्या ओतूर, कुंडाणे या भागांत तिन्ही बाजूला उंच डोंगरांच्या रांगा आहेत, त्यामुळे डोंगर व खोल दरी अशी घळ या ठिकाणी तयार झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीत मुरते, कालांतराने उष्णता वाढल्यास जमिनीखालच्या या पाण्याचे बाष्पिभवन होण्यास सुरुवात झाल्यास भूगर्भात हालचाली घडू शकतात असे भूगर्भ शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ही नियमित घडणारी प्रक्रिया असल्याने ग्रामस्थांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे शास्त्रज्ञांकडून स्पष्टीकरण दिले जात असले तरी, प्रत्यक्षात भूगर्भातील या हालचालींमुळे या भागातील गाव, वाड्यांवरील ग्रामस्थांमध्ये भयभयीत वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी सातत्याने भूकंपाचे धक्के बसल्याने तेथील ग्रामस्थांनी घरात झोपणे बंद करून उघड्यावर आसरा घेतला आहे. त्याहीपेक्षा ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे, त्यांच्यासाठी जमिनीत खालावत जाणारी पाण्याची पातळी हा चिंतेचा विषय आहे.
भूकंपाच्या धक्क्याने भूगर्भातील पातळी खोल
By admin | Published: May 12, 2017 1:00 AM