निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे-फत्तेपूर परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने महिला व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जाम नदीवरील ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक पाण्याच्या विहिरीनेही केव्हाच तळ गाठला असून, निऱ्हाळेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. निऱ्हाळे-फत्तेपूर गावासाठी प्रशासनाकडून दररोज टॅँकरच्या दोन खेपांनी पाणीपुरवठा केला जात असला तरी त्यात गावाची तहान भागत नसल्याने टॅँकरच्या खेपा वाढवून मिळाव्यात, अशी मागणी सरपंच प्रकाश दराडे, उपसरपंच गंगूबाई जाधव, सदस्य योगेश सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. टॅँकरचे पाणी सार्वजनिक विहिरीत टाकून सार्वजनिक त्याद्वारे गावात पाणीपुरवठा केला जातो. त्यात दररोज एकेक गल्लीस पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच गल्लीला पुन्हा आठवड्यातून एकदा पाणी मिळते. गावात चार दिवसांवर म्हसोबा महाराज यात्रोत्सव व त्यानंतर ग्रामदैवत शनैश्चर महाराज यांचा यात्रोत्सव येऊन ठेपला असून, पाहुण्यांची वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर त्वरित पिण्याच्या पाण्याच्या टॅँकरच्या फेऱ्या वाढवून मिळाव्यात, अशी मागणी सरपंच दराडे यांच्यासह सीताराम कटारनवरे, अण्णा काकड, शोभा शिंदे, सुनीता सांगळे, सविता सांगळे, आशा काकड, राजेंद्र वाघ, सुरेश कातकाडे, देवीदास वाघ, सुभाष यादव, सोपान काकड यांच्यासह ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. (वार्ताहर)
विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईची तीव्रता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 10:30 PM