'८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद अन् मार्गदर्शन करण्याचे काम करावे'; अजित पवारांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:08 PM2024-01-04T21:08:02+5:302024-01-04T21:08:23+5:30
शरद पवार गटाच्या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे दोन दिवसांचे शिबिर होत आहे. या शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार अनिल देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शरद पवार गटाच्या या शिबिरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला. माझी गेल्या तीस वर्षांची कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल की आम्हाला कुठेतरी संधी दिली पाहिजे. मी काही लेचापेचा नाही. तुमच्या तोंडावर एक बोलायचे आणि पाठीमागे दुसरे बोलायचे अशी मी व्यक्ती नाही, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच ८० वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, असा अप्रत्यक्ष टोला देखील अजित पवारांनी लगावला. नाशिकमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
आज भाजपाच्या हातात सत्ता- शरद पवार
आज अस्वस्थता आहे आणि त्याचे कारण हे सबंध देशाचे चित्र वेगळे आहे काही वक्तांनी त्याचा उल्लेख केला. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे आणि एक आक्रमक प्रचार यंत्रणा ही त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केलेली आहे. त्या प्रचार यंत्रणेतून जसे हिटलरचे जर्मनीमध्ये गोबेल्सनीती यासंबंधीची चर्चा होते, त्याचप्रमाणे जनमानसामध्ये प्रस्तुत करण्याचे काम भारतीय जनता पार्टीकडून सतत चाललेले आहे आणि त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असं शरद पवार शिबिरात म्हणाले.
शेतकऱ्यांची अवस्था चिंताग्रस्त- शरद पवार
देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे, अनेक गोष्टींनी तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये एकूण जी लोकसंख्या होती ती ३५ कोटी इतकी होती आणि त्या ३५ कोटींच्या ७०% ते ८०% लोक हे शेतीवर अवलंबून होते. आज आपण ११४ कोटींच्या पुढे गेलेलो आहोत, पण यापैकी ५६% लोक हे शेतीवर आहेत याचा अर्थ शेतीवर अडीच ते ३% लोक आहेत, परंतु ३००% लोकसंख्या वाढली पण, जमिनीचे क्षेत्र वाढलेले नाही ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. त्याचा परिणाम हा आहे की, एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासासाठी जमीन काढून घेणे. धरण बांधल्यामुळे शेतीची जमीन गेली, एमआयडीसी काढल्यामुळे शेतीची जमीन गेली शहर वाढलीत त्यामुळे शेतीची जमीन गेली, विकासाचे जे काही कार्यक्रम असतील त्यासाठी जमीन ही द्यावी लागते आणि त्यामुळे आज जमिनीचे प्रमाण हे कमी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही सहाजिकच चिंताग्रस्त झालेली आहे.