संजय पाठक, नाशिक- संथगती रुंदीकरण आणि पुलांची कामे त्यातच पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास शहापूर पासून ठाण्यापर्यँत अत्यंत खडतर झाला आहे. दहा- दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे.
नाशिक मुंबई प्रवास हा साडे तीन तासाचा प्रवास असला तरी आता सहा ते सात तास लागत आहेत. तसेच शनिवार आणि रविवार सारख्या सुटीच्या दिवशी तर दहा दहा किलोमीटर लांब रांगा लागतात. भिवंडी, शहापूर येथे मोठ्या प्रमाणात गोदाम असून त्या मुळे ट्रक, कंटेनर अशी अवजड वाहतूक या मार्गावरून असते. मात्र खड्ड्यामुळे ही अवजड वाहने हळू जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते.राज्याचे माजी मुख्य सचिव नितीन करीर यांना निवृत्तीच्या एक दिवस अगोदर कसारा येथून लोकलने प्रवास करावा लागला होता. तर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकहून- मुंबईला जाताना वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांनी विधी मंडळात संताप व्यक्त केला होता. नाशिकचे अनेक आमदार हे आता रेल्वेने प्रवास नाशिक- मुंबई करतात.
या सर्व पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.