लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांची गळती होत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच, व्यक्तीमत्व विकास व प्रगती साधण्यासाठी झटणाऱ्या उपक्रमशिल शिक्षकांनी गुरूवारी आपले अनुभव कथन करताना येणाºया अडचणीही पदाधिकारी, प्रशासन प्रमुखांसमोर मांडल्या. निमित्त होते शिक्षण विभागाच्या ‘कट्टा शिक्षणाचा’ उपक्रमाचे. यावेळी शिक्षकांची उपक्रमशीलता वाढविण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वार्षिक नियोजनाचा आराखडा तयार केला असून, त्यानुसार गुरूवारपासून ‘कट्टा शिक्षणाचा’ या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यादानाचे काम करणाºया काही शिक्षकांनी कोणतेही पाठबळ नसताना स्वत:च्या हिमतीवर शाळांमध्ये बदल घडवून आणतानाच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. अशा उपक्रमशील शिक्षकांना महिन्यातून एक वेळा जिल्हा परिषदेत बोलावून शिक्षण क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती, संस्था, शिक्षकांसमोर त्यांचे अनुभव, गुणवत्ता वाढीसाठी केले प्रयत्न, आलेले अनुभव व साधलेली शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याची सुरूवात केशव गावीत (हिवाळी, त्र्यंबकेश्वर), प्रकाश चव्हाण (करंजवण, दिंडोरी) व नंदलाल अहिरे (पिंपळगाव गरूडेश्वर,नाशिक) या शिक्षकांपासून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, शिक्षण सभापती यतीन पगार, सकाळचे संपादक श्रीमंत माने, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर उपस्थित होते. केशव गावीत हे वर्षातील ३६५ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शाळा भरवतात. तसेच त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला आहे तर प्रकाश चव्हाण यांनी बोरस्तेवाडी येथील वस्तीशाळेची दुरूस्ती स्वत:च्या बळावर केली त्याच बरोबर शेतमजुरांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. नंदलाल अहिरे यांनी देखील पटवाढीसाठी विविध उपक्रम राबविले त्याच बरोबर स्वयं अध्ययनासाठी साहित्याची निर्मिती केली आहे. तिघा शिक्षकांनी आपले सादरीकरण केले. त्यावर उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करून, त्याची व्याप्ती वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या पाहता, अधिकाधिक शिक्षकांना या उपक्रमशीलतेची माहिती दिली जावी जेणे करून त्यांनाही प्रोत्साहन मिळू शकते असे आवाहन केले. शाळा व शिक्षकांना भेडविणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. सुत्रसंचालन समग्र शिक्षणाचे दराडे यांनी केले.