नाशिक : स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या तथा माजी आमदार वसंत (बापू) उपाध्ये यांच्या पत्नी कमलताई उपाध्ये (वय ९०) यांचे मंगळवारी पहाटे अडीच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी पंचवटी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कमलतार्इंच्या निधनामुळे राष्ट्र सेवा दलाचा जिल्'ातील आधारवडच कोसळल्याची भावना व्यक्त होत आहे. उपाध्ये यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीराम उपाध्ये, सून डॉ. अपर्णा, मुली सुधा माळी व मीना महाजन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रायगड जिल्'ातील पेण येथील माहेर असलेल्या कमलतार्इंचा जन्म २८ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. मुकुंद लिमये हे स्वातंत्र्यसैनिक तथा राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते असल्याने लहानपणापासूनच कमलतार्इंवर सेवा दलाचे संस्कार झाले. मुंबईत होणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सभांमध्ये स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले. साने गुरुजींच्या त्या मानसकन्या होत्या. स्वातंत्र्य चळवळीतील मुलाशीच विवाह करण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यानुसार त्यांचा बापू उपाध्ये यांच्याशी सन १९४८ मध्ये विवाह झाला. नाशिकला आल्यानंतर त्यांनी बापूंना त्यांच्या कार्यात मोलाची साथ दिली. त्यावेळच्या बीएपर्यंत शिक्षण झालेल्या कमलतार्इंनी सन १९६२ ते १९८० या काळात सारडा कन्या विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. सन १९९९ मध्ये बापूंचे निधन झाल्यानंतरही त्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यात सक्रिय होत्या. समाज परिवर्तन केंद्राच्या त्या अखेरपर्यंत विश्वस्त होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. अखेर मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, ज्येष्ठ पत्रकार शरद बुरकुले, राम गायटे यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्र सेवा दलाच्या कमलताई उपाध्ये यांचे निधन
By admin | Published: December 10, 2014 1:10 AM