मालेगाव : तालुक्यातील अस्ताणे ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी एस. डी. अजवेलकर व नायब तहसीलदार बच्छाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अस्ताणे ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याची प्रकरणे माहिती अधिकारातून उघड झालेली आहेत. ग्रामपंचायतीच्या सन १९९९-२००० ते सन २००३-०४ व सन २०११-१२ च्या ्रग्रामनिधीत, सन १९९९-२०००, २००१ ते २००२ जवाहर योजनेत आक्षेपाधीन व वसूलपात्र रक्कम ही १० लक्ष ९० हजार २५९ रुपये एवढी आहे. सन २००७ ते २०११ या चार वर्षाचे ग्रामपंचायतीचे दफ्तरच गायब झालेले आहे. सन १९९५ पासून आजपर्यंत गावातील जवाहर हमी योजनेतील विहिरींचा लाभ शासकीय नोकरीत असलेले, ग्रामपंचायत सदस्य व गावातील धनदांडगे, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना नियमबाह्यरीत्या दिले गेल्याचे उघड झाले आहे. २० वर्षातील घरकुल योजनेची माहितीही ग्रामपंचायतीत उपलब्ध नाही. यामागेही आर्थिक गैरव्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सन २००८-०९ मध्ये ग्रामपंचायतीने जुनी इमारत पाडून त्या इमारतीचे लाकूड विकून त्याचा पैसा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा नाही. त्याचेही दफ्तर उपलब्ध नाही. ग्रामपंचायतीचे बरेच साहित्य माजी सरपंच यांच्या घरी नेण्यात आल्याचा शेरा लेखाधिकारी यांनी दिला आहे. दलित वस्ती सुधार योजना विकासनिधीत भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. गावातच ग्रामपंचायतीच्या जागेवर इंडस कंपनीचा मोबाइल टॉवर असून, टॉवरकडून मिळणाऱ्या उत्पन्नाची नोंद कुठेही सापडत नाही. या सर्व प्रकरणांची व त्यातील गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवीण शिरसाठ, एकनाथ देसाई, नाना जाधव, विजय देवरे, त्र्यंबक सूर्यवंशी आदिंनी निवेदनाच्या शेवटी केली आहे.
चौकशीची मागणी : अस्ताणेत ग्रामस्थांनी केली तक्रार; वासाळीत सरपंचाविरुद्ध सदस्यांनी थोपटले दंड
By admin | Published: February 15, 2015 10:42 PM