आठवडाभरापूर्वी महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या राजीवनगर येथील संपर्क कार्यालयावर दुपारी १ वाजेच्या सुमारास आठ ते दहा मोटरसायकलवर संशयित आरोपी सागर देशमुख व त्याच्या साथीदारांनी येत दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड केली होती. यावेळी महापालिकेच्या शासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती. तसेच केबल व्यवसायाचे सुमारे साडेबारा हजार रुपये लुटून नेले, तोडफोड करून जाताना टोळक्यांनी तुम्हाला सगळ्यांना बघून घेऊ, असा दमही त्यांनी दिला होता. इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर देशमुखसह त्याच्या साथीदारांवर दरोडा, शासकीय वाहनाचे नुकसान, दंगल, सार्वजनिक शांतता बिघडवणेसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील अटकेत असलेला संशयित आरोपी देशमुखसह त्याच्या साथीदारांना राजीवनगर येथील घटना घडलेल्या संपर्क कार्यालय परिसरात घटनेचा माहिती घेण्यासाठी नेण्यात आले होते. संशयितांनी घटनाक्रम पोलिसांना सांगितला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरेसह कर्मचारी उपस्थित होते.
कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या देशमुखला नेले घटनास्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:14 AM