नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्टÑवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसू लागताच राष्टÑवादीच्या प्रवक्त्या डॉ. भारती पवार यांनी भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खुद्द भारती पवार यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. तथापि, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने पवार यांचा भाजपा प्रवेश व दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी, असा दुहेरी योग साधण्याचा प्रयत्न केला जात असून, तसे झाल्यास भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या राजकीय भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागणार आहे.भारतीय जनता पक्षाने विद्यमान १०८ खासदारांना उमेदवारी न देण्याचे ठरविल्याचे बोलले जात आहे. ज्या अर्थी भाजपाने राष्ट्रवादीच्या नाराज डॉ. भारती पवार यांच्यासाठी गळ टाकला आहे, ते पाहता दिंडोरीतून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या निवडणुकीत पवार यांनी चव्हाण यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतरही त्यांचा मतदारसंघात वावर कायम राहिला.राष्टÑवादी कॉँग्रेसच्या प्रवक्त्या असलेल्या भारती पवार यांना दिंडोरीतून पक्षाचे उमेदवार मानले जात असताना ऐनवेळी शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्टÑवादीने प्रवेश दिला. त्यामुळे पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून त्या पक्षापासून दूर जात असल्याचे मानले जात होते. नेमका त्याचाच लाभ भाजपा उचलू पाहत असून, त्यांच्याकडून हरिश्चंद्र चव्हाण यांना पर्याय देऊ शकणाऱ्या डॉ. भारती पवार यांंना पक्षप्रवेश देण्याचे निश्चित केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पवार मुंबईत भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात असून, जोपर्यंत उमेदवारीची गॅरंटी मिळत नाही तोपर्यंत पक्षप्रवेश न करण्याचे त्यांनी ठरविले आहे.आपण अद्यापही राष्टÑवादीतच असून, कोणीतरी खोडसाळपणाने अशा प्रकारचे वृत्त पसरवित आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा असल्याने सध्या तरी आपण ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे, अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी व्यक्त केली आहे.
राष्टÑवादीच्या भारती पवार भाजपाच्या वाटेवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 1:55 AM