नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय इच्छुकांकडून आत्तापासूनच चाचपणी व फिल्डींग लावण्याचे काम सुरू असतानाच त्यात दिवाळी सणाच्या निमित्ताने मतदारांना शुभेच्छा देण्याची आयतीच संधी मिळाल्याने त्याचा पुरेपूर फायदा राजकारणासाठी करून घेण्यात आला आहे. अर्थातच या अशा प्रकारच्या शुभेच्छा देताना सर्वपक्षीय अंतर्गत राजकीय मतभेदही या निमित्ताने उफाळून आले असून, त्यातून एकमेकांचे पत्ते कापण्याबरोबरच केलेल्या कुरघोडीही उघड झाल्या आहेत.पुढच्या वर्षी लोकसभेच्या व विधानसभेच्या अशा दोन्ही निवडणुका होणार असून, त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्यापरिने करण्यास सुरूवात केली आहे. पक्षीय पातळीवर काही पक्षांनी खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर काही उमेदवारांनीही स्वत:विषयीचे राजकीय वातावरण तपासून पाहण्यास सुरूवात केली आहे. आगामी निवडणुकीचे चित्र नेमके काय असेल याचा अद्याप अंदाज येत नसला तरी, सद्यस्थितीत सुरू असलेल्या उमेदवारांच्या राजकीय हालचाली त्यांनी दिवाळी निमित्त दिलेल्या शुभेच्छांच्या माध्यमातून दिसून आल्या आहेत. विशेष करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघातून इच्छूक असलेल्यांनी स्वपक्षीय विद्यमान आमदारांचे छायाचित्र शुभेच्छा फलकावर न टाकण्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पश्चिम मतदार संघातून इच्छूक असलेल्या दिनकर पाटील यांनी आपल्या शुभेच्छा फलकावरून आमदार सीमा हिरे व मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या छायाचित्राचा सोयीस्करपणे विसर पाडून घेतला आहे. पुर्व मतदार संघातील एका इच्छूकाने आपल्या शुभेच्छा फलकावरून आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट केला आहे. मध्य मतदार संघात शिवसेनेच्या एका उपप्रमुखाने थेट शुभेच्छा फलकावर सेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सध्या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून सेनेलाच बुचकळ्यात टाकले आहे. या फलकामुळे बागुल सेनेत प्रवेश करतात की, उपप्रमुख भाजपाच्या वाटेवर आहे याबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपावर नाराज व अन्य पक्षात जाण्यात इच्छूक असलेले माजी आमदार अपुर्व हिरे यांनी मतदारांना शुभेच्छा देताना लावलेल्या फलकावर कोणत्याही नेत्याचे छायाचित्र प्रसिद्ध न करता, आपल्याच कुटूंबातील सदस्यांना स्थान देवून आपली संदिग्ध राजकीय भूमिका कायम ठेवली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर इच्छूकांची ‘राजकीय’ दिवाळी
By श्याम बागुल | Updated: November 7, 2018 15:47 IST
पुढच्या वर्षी लोकसभेच्या व विधानसभेच्या अशा दोन्ही निवडणुका होणार असून, त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्यापरिने करण्यास सुरूवात केली आहे. पक्षीय पातळीवर काही पक्षांनी खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर काही उमेदवारांनीही स्वत:विषयीचे राजकीय वातावरण तपासून पाहण्यास सुरूवात केली
निवडणुकीच्या तोंडावर इच्छूकांची ‘राजकीय’ दिवाळी
ठळक मुद्देकुरघोडीचे प्रयत्न : शुभेच्छा फलकांतून वातावरण निर्मिती