लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बॉलिवुडमधील सिनेअभिनेता रितेश देशमुखसोबत चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने हॉटेल व्यावसायिकाच्या मुलीची तब्बल साडेनऊ लाख रुपयांची फसवूणक करणाऱ्या तोतया चित्रपट दिग्दर्शकासह त्याच्या पत्नीवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हर्षद ऊर्फ हॅरी आनंद सपकाळ (२१, पाथर्डी फाटा) असे या तोतया चित्रपट दिग्दर्शकांचे नाव असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, नाशिक शहरच नव्हे तर राज्यभरातील अनेक तरुणींची सपकाळने आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ पाथर्डी फाटा येथे आलिशान व महागडा फ्लॅट भाडेतत्त्वावर राहणारा तोतया दिग्दर्शक हर्षद सपकाळ हा सोशल मीडियावरील व्हॉट््स अॅप, फेसबुक याद्वारे बॉलिवूडमधील सिने अभिनेता रितेश देशमुखसह अनेक नामांकित अभिनेते, अभिनेत्री तसेच दिग्दर्शकांसोबत ओळख असून, चित्रपटात काम मिळवून देतो अशी मार्केटिंग करीत असे़ केवळ चित्रपटच नव्हे तर मॉडेलिंग क्षेत्रातही संधी देण्याचे आमिष त्याने दाखविले होते़ सोशल मीडियावरील ही जाहिरात शहरातील हॉटेल व्यावसायिक शरद पाटील यांच्या मुलीपर्यंत पोहोचली़ पाटील यांच्या मुलीला अभिनयात रुची असल्याने ती वडिलांना संशयित हर्षदबाबत माहिती दिली़ हर्षदने पाटील यांच्याशी ओळख वाढवत परदेशात फिल्मचे शुटिंग सुरू असल्याची थाप मारली़ तसेच मुलीला रितेश देशमुखसोबत चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून डिसेंबर २०१६ पासून त्यांच्याकडून तब्बल नऊ लाख २८ हजार रुपये उकळले़ यानंतर मुलीच्या कामाबाबत विचारणा करताच तो टाळाटाळ तसेच मोबाइल बंद ठेवू लागला़ यादरम्यान पाटील यांनी अधिक चौकशी करताच त्याने आतापर्यंत सुमारे दहा ते बारा जणांना प्रत्येकी पाच ते वीस लाखांपर्यंत फसवणूक केल्याचे समोर आले़ पाटील पोलिसांकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर हर्षद फरार झाला होता़ मात्र पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यासमवेत तसेच पोलिसांच्या मदतीने मुंबई, गोवा, पुणे या ठिकाणी त्याचा शोध घेत होते़ पुण्यातील कोथरूड येथे एका मित्राच्या घरात लपलेल्या हर्षदची माहिती मिळताच पाटील व त्यांच्या नातेवाइकांनी त्याच्यावर नजर ठेवली़ मंगळवारी (दि़२०) हर्षद पुण्याहून नाशिकला खासगी बसने निघाला असता पाळतीवर असलेल्या त्यांच्या नातेवाइकाने त्याच्यासमवेत प्रवास करून दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास तो द्वारकेला उतरला असता त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून हर्षद व त्याची पत्नी अश्विनी सपकाळ विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.