पंचवटी : तुटपुंज्या वेतनामुळे झालेली बिकट आर्थिक परिस्थिती, सततचा तणाव यामुळे नाशिकच्या पंचवटी बस आगारातील कर्मचाºयांचे मानसिक संतुलन ढासळले असून, त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल व विरोधी पक्षनेत्यांकडे स्वेच्छामरणाची परवानगी मागितली आहे़ या आगारातील सुमारे सव्वाशे कर्मचाºयांनी बुधवारी (दि़ २१) आपले निवेदन संबंधितांना पाठविले आहे़ एसटीच्या कर्मचाºयांना अतिशय तुटपुंज्या वेतनात काम करावे लागते़ शासनाकडे वारंवार मागणी करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते़ याशिवाय एसटी प्रशासनाकडून पिळवणूक केली जात असल्याने या त्रासामुळे मानसिक संतुलन बिघडल्याने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो़ मात्र, आत्महत्या ही कायद्याने गुन्हा असल्याने आम्ही आत्महत्या करीत नाही़ एसटी कर्मचाºयांना वारंवार मागणी करूनही सेवाज्येष्ठतेनुसार वेतनश्रेणी दिली जात नसल्याने कर्मचारी त्रासले आहेत. आमच्या मागण्या मान्य होणार नसतील तर आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी तरी द्या़ आम्ही कोणाच्याही दबावाखाली ही मागणी करीत नसल्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़
एसटी कर्मचाऱ्यांनी मागितले इच्छामरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:16 AM