नाशिक : राज्यातील सर्व जागा लढविण्याची घोषणा करणाऱ्या वंचित आघाडीने नाशिकमधील एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. ज्यांची नावे इच्छुक म्हणून पुढे येत आहेत त्यांना पक्षाकडून अद्यापही शब्द देण्यात आला नसल्यामुळे वंचितच्या गोटात सध्यातरी शांतता जाणवत आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये खलबते सुरू झाली असून, स्थानिक पातळीवरील इच्छुकांकडून हालचाली गतिमान करण्यात आलेल्या आहेत. मनसेने देखील जिल्ह्यातील सर्वच जागा लढविण्यासाठीची चाचपणी सुरू केली आहे. मात्र वंचितने आपल्या लौकिकाला साजेसा निवडणूकपूर्व दबदबा अद्याप निर्माण केलेला दिसत नाही. वंचित आघाडीकडून शहरातील चारही जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी चालविली असताना पूर्व आणि देवळाली वगळता अन्य दोन्ही मतदारसंघांबाबत कोणत्याही इच्छुकाचे नाव समोर आलेले नाही. आमचे उमेदवार ठरले आहेत, असे पक्षाकडून सांगण्यात येत असले तरी मग नावे गुलदस्त्यात ठेवण्यामागे कोणती राजकीय मुत्सदेगिरी आहे हे मात्र न कळणारे आहे. पूर्व आणि देवळालीतून लढणाऱ्यांमधून दोनच नावे पुढे केली जात आहेत. त्यातही यातील एक नाव देवळालीसह पूर्वसाठीदेखील घेतले जाते. मध्य मधून लढण्यासाठी मोठा राजवाडा येथून एका इच्छुकाला संधी मिळण्याची चर्चा केली जाते, मात्र त्यांच्याकडून तयारी दिसत नाही. जिल्ह्यातील नांदगावमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या एकाने स्वपातळीवर तयारी चालविली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या गतीने वंचितने आपला दबदबा निर्माण केला ती गती विधानसभेबाबत मात्र दिसत नाही.वंचितची दारे खुली की बंद?पक्षाचे काम करणारे निष्ठावान आणि क्रियाशील कार्यकर्त्याला प्रथम उमेदवारीची संधी त्यानंतर बाहेरून आलेल्यांचा विचार तोही स्थानिक पदाधिकाºयांच्या संमतीने करण्याची भूमिका वंचितने यापूर्वीच मांडली आहे. त्यामुळे वंचितकडे डोळे लावून बसलेल्या अन्य इच्छुकांमध्ये वंचितची दारे आपल्यासाठी खुली आहेत की बंद, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिकृत घोषणेपासून इच्छुक ‘वंचित’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:54 AM