नाशिक : समृध्दी महामार्गाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने केवळ मुख्यमंत्र्यांना काही मिनिटे शिष्टमंडळ भेटून संवाद साधण्याची परवानगी घेतली होती; मात्र शेतकऱ्यांना नाशिकच्या भगूर येथील सप्तश्रृंगी मंदिराच्या मैदानात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापासून पोलिसांनी रोखल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच काही शेतकऱ्यांना देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे मोबाइलही जप्त केले होते. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.सावरकर जयंतीनिमित्त भगूर येथील सावरकर यांच्या स्मारकाला भेट देऊन मुख्यमंत्री फडणवीस जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी भगूरकडे जिल्ह्यातील विविध गावांमधून शेतकरी पोहचत होते. कर्जमाफी, समृध्दी महामार्ग, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत फडणवीस भाषणामध्ये काय घोषणा करतात, या उत्सुकतेपोटी शेतकरी येण्याचा प्रयत्न करत होते; मात्र गांधी टोपी आणि शेतकरी पोशाख बघून पोलिसांनी भगूरच्या दिशेने येणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने माघारी धाडली, असा आरोप समृध्दी महामार्गविरोधी शेतकरी संघटनेने केला आहे.,स्थानिक कार्यक्रमाचे संयोजक पदाधिकारी भगूर पोलीस प्रशासन, देवळाली कॅम्प पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींसोबत कार्यक्रमापुर्वी चर्चा करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्यासोबत पाच मिनिटांची वेळ मिळावी, यासाठी परवानगीदेखील घेतली होती, अशी माहिती संघटनेचे राजू देसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली; शेतकरी कुठल्याही आंदोलनाच्या भूमिकेत अजिबात नव्हते; मात्र पोलिसांनी बळाचा वापर व दबावतंत्र निर्माण करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना फडणवीस यांच्या कार्यक्रमापासून रोखले तसेच जे शेतकरी पोहचले त्यांनाही कार्यक्रमाच्या ठिकाणाहून ताब्यात घेत अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.या सर्व प्रकारामुळे समृध्दी महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीने आता फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. कारण शेतकऱ्यांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे.
परवानगीनंतरही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रोखले
By admin | Published: May 28, 2017 2:40 PM