नाशिक : शहरातील एकमेव चांगला आणि पंचवीस वर्षांत एकही खड्डा न पडलेला महात्मा गांधी रोड हा पावसाळी गटारीसाठी फोडण्याच्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महापालिका आणि ज्यांनी हा रस्ता बनवला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या कडेला अगोदरच पावसाळी गटारी तयार करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात पुरेशी माहिती न घेताच हा रस्ता फोडण्याचा प्रकार म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा अशी स्मार्ट सिटी कंपनीची स्थिती असल्याची टीका होत आहे. स्मार्ट सिटीचा प्रत्येक प्रकल्प वादग्रस्त ठरत असतानाच गावठाणातील खोदकाम आणि रस्त्याची उंची आणखी कमी करून पुराचा धोका वाढवण्याचा आरोप होत आहे. त्यातच आता गावठाणातील जे आणखी काही रस्ते खोदण्याचे प्रस्ताव आहे, त्यात एम. जी. रोडचादेखील समावेश करण्यात आला आहे. नाशिकमधील एम.जी. रोड हा नाशिक शहरातील सर्वाधिक मजबूत आणि आदर्श रोड मानला जातो. त्याचे तोडकाम करण्याच्या प्रस्तावामुळे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या रस्त्यावर पावसाळी गटारी टाकण्याचे काम स्मार्ट सिटी करणार असलीतरी मुळात या रस्त्याच्या कडेला अगोदरच पावसाळी गटारी असल्याची माहिती महापालिकेचे काही आजी-माजी अधिकारी आणि संबंधित रस्त्याचे काम करणारे शिवराम कडभाने यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. त्याचदरम्यान म्हणजेच १९९२ महापालिकेने महात्मा गांधी रोडचे काम करण्यासाठी निविदा मागवली होती. साधारणत: दोनशे ते अडीचशे मीटरचा हा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर ट्रिमिक्स काँक्रिटकरणाचा पहिला प्रयोग म्हणून हाती घेण्यात आला होता. या रस्त्यावर ३५ लाख रुपये खर्च झाले आणि अत्यंत मजबूत रस्ता तयार झाला. अत्यंत गुळगुळीत असा हा रस्ता नंतर कितीही तंत्रज्ञान बदलले आणि स्मार्ट सिटीने १ किलोमीटर रस्त्यासाठी १७ कोटी रुपये खर्च केले तरीही तो साकारलेला नाही.
या रस्त्याच्या अडीचशे मीटर लांबीत दर तीस मीटर अंतरावर डक्ट असून, त्यातून जलवाहिनी सारख्या सर्व्हिसलाइन टाकण्याची सोय आहे. तसेच पावसाळी गटारीसाठी चेंबर्सचीदेखील सोय करण्यात आली आहे. अर्थात, या ठिकाणी पाणी किती साचते याचा शास्त्रीय अभ्यास करून ही व्यवस्था केली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने या रस्त्याची कोणतीही माहिती न घेता पावसाळी गटारी टाकण्याचा केलेला अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न केला जात आहे.
इन्फो..
पावसााळी पाण्याचा शास्त्रीय अभ्यास
महापालिकेने हा रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचा शास्त्रीय अभ्यास केला आहे. गोळे कॉलनीतील पाणी अशोक स्तंभाकडे वाहून जाते. स्टेडियम कॉम्प्लेक्समधील साचलेले पाणी तेथेच असते. तेही एम.जी. रोडवर येत नाही. एम. जी. रोडवर पाणी साचत नाही आणि साचले तरी उतारामुळे ते चटकन वाहून जाते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून रस्ता तयार करताना व्यवस्था केल्या असून, त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांत एकदाही या ठिकाणी पाणी साचलेले नाही. मात्र, ही सर्व माहिती कंपनीने घेतलेलीच नाही.