पाथर्डी फाटा : विल्होळी जकातनाका येथे असलेल्या मनपाच्या कचरा डेपोमधून अलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे थेट पाथर्डी फाट्यापर्यंतचा परिसर प्रभावित झाला आहे. परिसरातील नागरिक व कचरा डेपोजवळून जाणाºया महामार्गावरील वाहनधारकांना या दुर्गंधीने हैराण केले असून, त्याचा संबंधितांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण शहराचा कचरा पाथर्डी शिवारातील मनपाच्या कचरा डेपोत संकलित केला जातो. तिथल्या दुर्गंधी व पाणी प्रदूषणाच्या अनेक तक्ररी पाथर्डी फाटा, गौळाणे, पाथर्डीगाव, वाडीचे रान भागातून नागरिक व शेतकºयांनी नियमितपणे केलेल्या होत्या. अलीकडे येथे जर्मन कंपनीने खत व कचºयापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू केल्याने दुर्गंधी व प्रदूषण कमी होण्याची आशा निर्माण झाली होती. मधला काही काळ दुर्गंधी येणे नियंत्रित झालेही होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी आश्चर्य व नाराजी व्यक्त केली आहे. गेले अनेक दिवस या दुर्गंधीचा सामना गौळाणे, पाथर्डी व पाथर्डी फाटा परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे. कचरा डेपोजवळूनच महामार्ग जातो. येथून जाणाºया वाहनांमधील प्रवाशांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. अनेकांच्या प्रकृतीवरही त्याचा परिणाम होत असल्याने संबंधित यंत्रणेने या दुर्गंधीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.