नाशिक : भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोड येथून २७४ प्रशिक्षणार्थी नवसैनिकांची तुकडी गुरुवारी (दि.१८) देशसेवेत दाखल झाली. ४२ आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत ‘तोपची’ म्हणून स्वत:ला सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांनी लष्करी थाटात संचलन करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘सॅल्यूट’ केला.
सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या युवकांना भारतीय सेनेत जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या तोफखाना केंद्राची स्थापना नाशकात १९४८ साली करण्यात आली. गुरुवारी कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या नवसैनिकांच्या शपथविधी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्राचे कमांडंट ब्रिगेडियर जे.एस. गोराया उपस्थित होते. त्यांनी मैदानावरील संचलनाचे बारकाईने निरीक्षण करत उपस्थित नवसैनिकांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुरुमंत्र देत शुभेच्छा दिल्या. फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच गुरुवारीसुद्धा या सोहळ्यावर कोरोनाचे सावट पाहावयास मिळाले. संचलनात सहभागी झालेल्या २७४ जवानांच्या तुकडीने तोंडावर मास्क लावून व परस्परांमध्ये अंतर राखल्याचे दिसून आले. सैनिकी शिस्तीचे दर्शन यावेळी घडले.
शपथविधीसाठी केंद्राच्या पारंपरिक प्रथेनुसार मैदानावर होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यासारख्या तोफा आणण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी म्हणून नारायण शिंदे या नवसैनिकाला गौरविण्यात आले.
---इन्फो--
... यंदा ‘गौरव पदक’ जवानांकडे सुपूर्द
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तोफखान्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने जवानांच्या विविध गावांमधून येणाऱ्या पालकांना या सोहळ्यासाठी प्रवेशास मनाई करण्यात आली होती. यामुळे जवानांच्या कुटुंबीयांना या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. मोठ्या सन्मानाने वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी माता-पित्यांना दिले जाणारे ‘गौरव पदक’ यंदा नवसैनिकांकडे सुपूर्द करत त्यांच्या माता-पित्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.