भारतीय तोफखाना केंद्रात बुधवारी (दि.७) मोठ्या उत्साहात दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते. यांनी उपस्थित नवसैनिकांच्या तुकडीच्या संचलनाचे समीक्षण केले. तोफखान्याच्या लष्करी बॅन्ड पथकाने वाजविलेल्या देशभक्तीपर गीताच्या वैशिष्ट्यपूर्ण धूनवर नवसैनिकांनी परेड सादर केली. यानंतर मैदानावर तोफखान्यातील विविध तोफा आणल्या गेल्या. तोफांच्या साक्षीने या तुकडीने देशसेवेची शपथ घेतली. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी नवसैनिक म्हणून दीपक कुमार यांना गौरविण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता नवसैनिकांच्या पालकांना या सोहळ्याला हजेरी लावता आली नाही. यामुळे माता-पित्यांना सन्मानपूर्वक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून प्रदान केले जाणारे गौरवपदक यंदाही जवानांकडे सुपूर्द करण्यात आले. ‘मेरी संतान देश को समर्पित’, ‘भारतीय सेना’ असा उल्लेख या गौरवपदकावर वाचावयास मिळतो.
---इन्फो---
दरवर्षी घडतात ५,५००नवसैनिक
१९४८साली स्थापन झालेले भारतीय तोफखाना केंद्र हे देशातील सर्वाधिक जुने व मोठे प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. या केंद्रातून दरवर्षी ५ हजार ५०० नवसैनिक घडविले जातात. ‘तोफची’ (गनर) म्हणून हे नवसैनिक भारतात विविध ठिकाणी तोफा हाताळण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी बजावतात. कोरोनाकाळातसुध्दा नवसैनिकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य अखंडितपणे केंद्रात सुरुच आहे.