नाशिकरोड : नर्मदा बचाव आंदोलक व विभागीय आयुक्त यांच्यात साडेआठ तास झालेल्या चर्चेत पुनर्वसनाच्या जमिनीबाबत एकमत न झाल्याने ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी जाहीर केला, तर ६६१ हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध असून, येत्या २२ एप्रिलपासून जमीन दाखविण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी जाहीर केले. आंदोलकांचे इतर प्रश्न, समस्या यावर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आल्याने त्याबाबत समाधानी असल्याचे आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी स्पष्ट केले. नर्मदा काठच्या आदिवासींचा पुर्नवसनाचा प्रश्न, त्यांना देण्यात येणाऱ्या जमिनी व इतर प्रश्न-समस्याबाबत नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारपासून विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. बुधवारी मुंबईला कामानिमित्त गेलेले विभागीय आयुक्त एकनाथ डवले हे गुरूवारी सकाळी कार्यालयात हजर झाले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात गुरूवारी सकाळी १०.३० वाजेपासून आंदोलकां सोबत चर्चेला प्रारंभ झाला. व्यासपीठावर विभागीय आयुक्त एकनाथ डवले, आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, रोहयो उपायुक्त प्रवीण पुरी, महसूल प्रबोधिनीचे उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड, पुरवठा उपायुक्त रावसाहेब बागडे, महसुल उपायुक्त सतीश देशमुख, उपविभागीय अधिकारी विनायक गोसावी आदि उपस्थित होते.
नर्मदा आंदोलन ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
By admin | Published: April 17, 2015 1:21 AM