नाशिक : कोविडचे संकट राज्यात पसरले असून संमेलन आयोजनात अनंत प्रकारच्या अडचणी आहेत. तरीही या अडचणींवर मात करून नाशिकमध्ये होणारे साहित्यसंमेलन आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी केले.
कोविडमुळे सध्या रोज परिस्थिती बदलत आहे. संमेलनाच्या तारखेपर्यंत ही परिस्थिती निवळेल आणि संमेलन यशस्वीपणे पार पडेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. संमेलन यशस्वीतेसाठी समिती सदस्य, कार्यकारी मंडळ, हितचिंतक यांचे योग्य दिशेने प्रयत्न चालू असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, कार्यवाह भगवान हिरे, निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, प्रमुख समन्वयक विश्वास ठाकूर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्रा. आर. पी. देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्ताने कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. सभेने इतिवृत्ताला मंजुरी दिली. त्यानंतर कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी आतापर्यंत झालेल्या कार्याची माहिती दिली. जातेगावकर यांनी झालेला खर्च सभेपुढे सादर केला. सभेने त्या खर्चास मंजुरी दिली. सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले.