नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४, ५ डिसेंबरला मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात होत असून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी विद्रोही साहित्याचा पुरस्कार करणाऱ्या आणि वैचारिकता मानणाऱ्या वाचकांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन विद्रोही संमेलन संयोजन समितीने केले आहे.
विद्रोही संमेलन समितीची केटीएचएम महाविद्यालयात मंगवारी (दि. २३) आढावा बैठक झाली. यात जनतेच्या पैशातून १ मूठ धान्य व १ रुपया या संकल्पननेनुसार निधी संकलनासह विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्याचप्रमाणे परिसंवाद, कवी, नाट्य, बालमंच, तसेच नियोजनमध्ये जबाबदारी घेण्यासंदर्भात केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी प्राध्यापक, शिक्षकांना आवाहन केले. या प्रसंगी संमेलनाचे मुख्य संयोजक राजू देसले यांनी संमेलन आयोजनाची भूमिका तसेच नियोजनाबाबत भूमिका मांडतानाच शिक्षक प्राध्यापकांना संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी संमेलन कार्याध्यक्ष प्रभाकर धात्रक, विश्वस्त प्रल्हाद मिस्त्री, किशोर ढमाले, उपप्राचार्य एस. एन. कासव, पी. व्ही. कोत्मे, डी. एस. महोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे किशोर ढमाले यांनी संमेलनाची भूमिका मांडली. प्रा. नारायण पाटील यांनी मदतीचे आवाहन केले . प्रा. डॉ. दिलीप पवार यांनी ५ हजार रुपये तसेच इतर प्राध्यापकांनी १० हजार रुपये जमा करून दिले. प्रा नारायण पाटील यांनी आभार मानले.