नाशिक : सावाना, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यासारख्या संस्था या नाशिककरांसाठी मंदिरासमान असून त्यांचे पावित्र्य राखलेच जायला हवे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून कुणी दुष्प्रवृत्ती सावानात शिरकाव करू इच्छित असतील किंवा आधीपासूनच तिथे असतील त्या दुष्प्रवृत्तींना सुशिक्षित, जाणकार सभासदांच्या माध्यमातून सावानाबाहेर ठेवण्याचा निर्धार सावाना सहविचार सभेत मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रांतील काही मान्यवरांची एक पंच समिती आणि दबावगट तयार करण्याचा मानसदेखील व्यक्त करण्यात आला.
अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेत साहित्यिक नरेश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी सावानाशी संबंधित विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. यशवंत पाटील यांनी सावानातील सभेचे चित्र हे साखर कारखान्याप्रमाणे दिसणे अत्यंत क्लेशदायक ठरल्याचे सांगितले. विनायक रानडे यांनी सावानासारख्या संस्थेत निवडणुका न होता, नेमणुका होणे आवश्यक असल्याचेही रानडे यांनी नमूद केले. रमेश देशमुख यांनी आवड, निवड आणि सवड असणाऱ्यांनी काम करण्यासाठीच सावानावर येण्याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. सुहास भणगे यांनी जातीपातीचा विचार न करता चांगल्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे सांगितले. ॲड. मिलिंद चिंधडे यांनी पॅनलऐवजी वैयक्तिक उमेदवार उभे राहण्याबाबत घटनाबदल होणे आवश्यक असल्याचे सांगितले. राजेंद्र उगले यांनी वास्तूचे पावित्र्य जपले जाण्यासाठी पॅनलचा पर्याय देणार, की काही भूमिका घेणार ते स्पष्ट करण्याचे आवाहन केले. श्रीकांत बेणी यांनी निवडणुका यापूर्वीदेखील झाल्या असून दोन्ही बाजूंनी मीपण सोडल्यास अनेक बाबी सुकर होतील. कोर्ट-कचेऱ्या थांबाव्यात ही माझीदेखील इच्छा असून, येथील मान्यवरांनी त्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्यास मी चार पावले टाकायला तयार असल्याचे सांगितले. ॲड. अभिजित बगदे यांनी सावानातील कोर्टकचेऱ्या क्लेशदायक असून मी स्वत: या सर्व प्रकाराला कंटाळलो असल्याचे सांगितले. सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी मिळून सावानातील कोर्ट, कचेऱ्या संपविण्यासाठीची हाती घेतलेली मोहीम तडीस न्यावी, अशी विनंती करीत असल्याचे सांगितले. प्र. द. कुलकर्णी यांनी फेडरेशन स्थापनेची आवश्यकता असल्याचे नमूद केले. यावेळी सुभाष सबनीस, संतोष हुदलीकर, विलास पोतदार यांच्यासह अन्य सभासदांनी मनोगत व्यक्त केले.