मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मोर्चे, आंदोलने झाली. अनेक आंदोलनांचे निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने नाशिकमध्येच घेतली होते. मराठा आरक्षणासाठी सदैव सक्रिय असलेल्या नाशिकमधील समाजाच्या प्रतिनिधींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे माेठा धक्का बसला आहे. मात्र, सध्या कोराेनामुळे राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता, प्रत्येकाने घरीच राहावे लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे कळवण्यात आले.
दरम्यान, कॉ.राजू देसले, करण गायकर, योगेश गांगुर्डे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पंचवटी कारंजा येथे शिवपुतळ्यासमोर शपथ घेतली. त्यानुसार, मराठी आरक्षणासाठी गेल्या चाळीस वर्षांपासून आंदोलने करताना ज्यांचे प्राण गेले, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, तसेच मराठा आरक्षणासाठी यापुढेही निर्धाराने लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, अन्य अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास होता, परंतु प्रत्यक्षात अपेक्षित निर्णय झालेला नाही. अन्य राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असताना, महाराष्ट्रात मात्र त्यापेक्षा अधिक आरक्षण नको, अशी न्यायलयाने भूमिका घेतली. समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने त्यासाठी प्रयत्न करावे. यापूर्वी शांततेचे मोर्चे दिसले, परंतु आता उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करण गायकर व राजू देसले यांनी दिला आहे.