त्र्यंबकेश्वर : गर्भगृहात जाऊन दर्शन, जलाभिषेक करण्याचा त्र्यंबकेश्वर देवस्थानचा वादग्रस्त निर्णय अखेर साधू, महंतांच्या आंदोलनात्मक पवित्र्यापुढे मागे घेण्यात आला. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पाच वाजता सर्व साधू, महंतांनी शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि या विषयावर पडदा पडला.
गेले काही दिवस त्र्यंबकेश्वर साधू, महंत महामंडलेश्वर 'महाशिवरात्रीला आम्हाला गर्भगृहात सोडण्याची परवानगी मिळावी, अशी देवस्थान ट्रस्टकडे मागणी करत होते. शेवटी, सोमवारी (दि.२८) सर्व साधू, महंतांनी जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला. पण, जिल्हाधिकारी नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देण्यात आले. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे पथकासह त्र्यंबकेश्वर येथे बंदोबस्त नियोजनासाठी आले असता त्यांचीही भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तसेच साधू, महंत त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, संतोष कदम, भुतडा भूषण, अडसरे, सुरेश गंगापुत्र आदींची संयुक्त बैठक होऊन देवस्थान ट्रस्टतर्फे आपला अनादर होईल, असा आमचा हेतू कधीच नव्हता. कोविड-१९
च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आम्ही गर्भगृहातील प्रवेश सर्वांनाच बंद केला होता. तसेच पाणी पंचामृत वाहिन्यांमुळे दगडी पिंडीची झीज होते म्हणून पुरातत्त्व विभागाच्या आदेशाचे आम्ही पालन करत होतो.
शेवटी साधू, महंतांना मंगळवारी (दि.१) पहाटे गर्भगृहात जाऊन दर्शन घेण्याची अनुमती मिळाली. दरम्यान, सोमवारी झालेल्या या बैठकीस महामंडलेश्वर महंत सोमेश्वरानंद सरस्वती, महंत मनीषगिरी, आवाहन आखाडा महंत धनंजयगिरी, निरंजनी आखाडा महंत सुखदेवगिरी, महंत विष्णुपुरी महाराज, जुना आखाडा महंत गोपालदास, उदासीन आखाडा (नया) महंत जर्नलसिंग निर्मलसिंह, महंत सूखाज, अटल आखाडा स्वामी विश्वरूपानंद, श्रीराम कृष्ण मिशन आरोग्यधाम महंत अजयपुरी, महानिर्वाण आखाडा स्वामी दिव्यानंद, अन्नपूर्णा आश्रम महंत गोपालदास महाराज, उदासीन थानापती महंत आनंदपुरी महाराज, आवाहन आखाडा आदी संत महंत उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर महामंडलेश्वर महंत शिवगिरी महाराज, महामंडलेश्वर महंत रघुनाथदास, महंत योगेश्वरनाथ, महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, अष्टकौशल महंत देवराज, पुरी रूपेश्वर महादेव महंत महेंद्रपुरी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.