लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत, कोणती विकासकामे हाती घेण्यात येऊन ती पूर्णत्वास न्यायची आहेत, याचे सूक्ष्म नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व संबंधित कामे शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर्षात गावाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी लोहोणेर येथे आयोजित ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभात केले.यावेळी पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे, उद्योजक संदीप सोनवणे, परिवर्तन पॅनलचे नेते प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बनसोड म्हणाल्या की, शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, महिलांना डोक्यावर हंडा घेऊन इतरत्र फिरण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाने प्रत्येक घरी नळजोडणी योजना सुरू केली आहे. या माध्यमातून २ लाख ४२ हजार नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहे. त्याचा लाभ गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी करून घ्यावा. दारिद्र्य निर्मूलनासाठी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असून, यासाठीचा आराखडा ग्राम पातळीवर तयार करण्यात यावा. गावाचा विकास साधायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन ग्रामविकास साधणे गरजेचे आहे. गावाचा विकास हाच केंद्रबिंदू मानून विकासकामे हाती घेण्यात यावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी प्रसाद देशमुख व ग्रामपंचायत सदस्य रतीलाल परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सतीश देशमुख, योगेश पवार, रमेश आहिरे, अनिल आहिरे, निबा धामणे, धोंडू आहिरे, चंद्रकात शेवाळे, संजय सोनवणे, पूजा सोनवणे, प्रतिभा सोनवणे, उषाबाई सोनवणे, पौर्णिमा आहिरे, सविता शेवाळे, आदींसह परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब पाठक यांनी केले.
कामांचे सूक्ष्म नियोजन करून विकास साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 7:18 PM
लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत, कोणती विकासकामे हाती घेण्यात येऊन ती पूर्णत्वास न्यायची आहेत, याचे सूक्ष्म नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व संबंधित कामे शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर्षात गावाचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी लोहोणेर येथे आयोजित ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभात केले.
ठळक मुद्दे लीना बनसोड : लोहोणेर ग्रामपालिकेत सत्कार