नाशिक : समाजसेवेच्या माध्यमातून समाज एकत्र करण्याचे जाळे विणले जाते. एका विचाराने समाजात काम केल्यास त्या त्या समाजाची विकास व उन्नती होते, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे.लेवा समाज कल्याण मंडळाच्या वतीने एकनाथ खडसे यांचा सत्कार व समाजातील उपवर वधू-वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार राजूमामा भोळे, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, संभाजी मोरुस्कर, सतीश सोनवणे, सतीश कुलकर्णी, लेवा समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष संजय वायकुळे, अरविंद अत्तरदे, अशोक भिरुडे, डॉ. नामदेव पाटील, हेमंत पाटील, अरुण पाटील, लिना पाटील, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. राजेंद्र नेहते, अनिल महाजन, रवींद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लेवा समाज कल्याण मंडळाने तयार केलेली वधू-वर सूचीचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, आपण जगात कुठेही गेलो, तरी प्रत्येक समाज आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत असतो. आज लेवा समाज ठराविक जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता राज्यभर पसरला आहे. त्यामुळेच आपण हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही समाजाच्या कार्यक्रमास उपस्थित आहोत. समाजासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, तसेच समाजानेही एका हाकेसरशी समाजातील अडचणीत सर्वांनाच मदत केली पाहिजे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले, हा समाज देशभर नव्हे तर जगभर पसरला आहे. वधू-वर मेळाव्यात नेहमीच सरकारी नोकरी आणि चांगला हुद्दा पाहिला जातो. मात्र शेतकऱ्यांच्या मुला-मुलींशी कोणीही लग्न करण्यास तयार होत नाही. हुंडाबळीसारख्या अप्रवृत्ती रोखण्याबरोबरच सामूहिक विवाह सोहळे आयोजनाची मोठी जबाबदारी समाजावर आहे. तसेच बेटी बचाव उपक्रम सर्वच समाजबांधवांनी राबविण्याची आज गरज निर्माण झाली आहे. आपल्याला आपल्या समाजाचा अभिमान असला पाहिजे, मात्र असे करताना अन्य समाजाचाही सन्मान करता आला पाहिजे. एका विचाराचा समाज असेल तर त्या समाजाची विकास व उन्नती लवकर होते. सुरुवातीला लेवा समाज मंडळाचे अध्यक्ष संजय वायकुळे यांनी प्रास्ताविक केले, तर आमदार बाळासाहेब सानप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा एकनाथ खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
एक विचाराच्या समाजामुळे विकास
By admin | Published: November 28, 2015 11:58 PM